मानसिक आरोग्य महत्त्वाचे !

एका अभ्यासानुसार कोरोना महामारीनंतर नैराश्य आणि चिंताग्रस्त लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला लोक कसे सामोरे जात आहेत ? याचे सर्वेक्षण करण्यात आले. अनुमाने १० सहस्र भारतियांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यातील २६ टक्के लोकांना सौम्य स्वरूपात नैराश्य जाणवत आहे, तर ११ टक्के लोक तीव्र नैराश्याने ग्रासले आहेत, तसेच ६ टक्के लोकांनी नैराश्याची गंभीर लक्षणे दिसत असल्याचे मान्य केले. या टक्केवारीवरून येणार्‍या कोणत्याही स्वरूपाच्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी लोकांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे किती आवश्यक आहे ? हे अधोरेखित होते. लोकांच्या मानसिक आरोग्याचा देशाची प्रगती, अर्थव्यवस्था आणि सामाजिक स्वास्थ्य यांवर परिणाम होतो. त्यामुळे प्रथम प्राधान्य मानसिक आरोग्याला देणे, ही काळाची आवश्यकता आहे.

‘जागतिक आरोग्य संघटने’च्या निरीक्षणानुसार जगात प्रतिवर्षी अनुमाने ८ लाख लोक आत्महत्या करतात. सर्वांत विकसित देश मानल्या गेलेल्या अमेरिकेत नैराश्यग्रस्त लोकांची संख्या सर्वाधिक आहे; परंतु त्यापैकी निम्म्या लोकांनाच उपचार उपलब्ध होतात. मनोबल अल्प असणे, हेच नैराश्य आणि आत्महत्या यांचे प्रमुख कारण आहे. नैराश्य येण्यामागील अनेक कारणांमध्ये ‘आर्थिक समस्या’ हेही एक कारण आहे. संभाव्य आपत्काळ आणि जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्था यांची स्थिती पाहिल्यास आर्थिक मंदीची लाट प्रत्येकाच्याच गळ्याशी येणार आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत सकारात्मक रहाणे आणि परिस्थिती कोणत्याही अंगाने बिकट झाली, तरी त्याला सामोरे जाण्याची सिद्धता करणे आवश्यक आहे. मन स्थिर आणि खंबीर असल्यास कोणत्याही संकटाचा सामना करणे सोपे जाते. मनाला खंबीर बनवण्यासाठी विज्ञान नव्हे, तर अध्यात्मच उपयोगी पडते.

यासाठी प्रत्येकाने स्वतःची दिनचर्या पालटणे आवश्यक आहे. यामध्ये आहार-विहारापासून ते आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्यासाठी साधना करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सात्त्विक आहार घेणे, प्रतिदिन योगाभ्यास, कुलदेवतेचे नामस्मरण करणे अनिवार्य आहे. ‘मनुष्य स्वस्थ, तर देश स्वस्थ’, हे लक्षात घेऊन सरकारनेही नागरिकांचे मानसिक आरोग्य कसे सुदृढ होईल ?  याकडे लक्ष द्यावे, असेच जनतेला वाटते.

– श्री. सचिन कौलकर, मुंबई.