सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची निर्गुणाकडे वाटचाल होत असल्याने त्यांच्या छायाचित्रांमध्ये दिसून येणारे बुद्धीअगम्य पालट !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची विविध वैशिष्‍ट्ये त्‍यांच्‍या छायाचित्रांतून दिसून येत असतात. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यातील वाढत्‍या निर्गुण तत्त्वामुळे त्‍यांच्‍या देहात होत असलेले बुद्धीअगम्‍य पालट त्‍यांच्‍या छायाचित्रांच्‍या माध्‍यमातून गेल्‍या काही वर्षांत दिसून आले. साधारण वर्ष २०१६ मध्‍ये साधकांच्‍या लक्षात आले की, छायाचित्रांमध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आकृती इतरांच्‍या तुलनेत अस्‍पष्‍ट आणि धूसर दिसते. वास्‍तविक त्‍यांची छायाचित्रे ज्‍या छायाचित्रकांमधून काढली जातात, ते उच्‍च गुणवत्तेचे आहेत. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले असलेल्‍या छायाचित्रांतील अन्‍य व्‍यक्‍ती, साधक आणि संत हे अत्‍यंत स्‍पष्‍ट दिसतात; पण केवळ सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच धूसर किंवा अस्‍पष्‍ट दिसतात. याचा अभ्‍यास करण्‍यासाठी आम्‍ही छायाचित्र काढण्‍याच्‍या संदर्भातील तांत्रिक कारणेही अभ्‍यासली; परंतु प्रकाशयोजना, छायाचित्रक, त्‍याची ‘लेन्‍स’, छायाचित्रकाराने छायाचित्र काढतांना घेण्‍याची काळजी अशा सर्व स्‍तरांवर कोणतीच त्रुटी आढळून आली नाही. कोणतीच तांत्रिक अडचण नसतांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र अस्‍पष्‍ट येण्‍यामागे पुढील बुद्धीअगम्‍य सूत्रे लक्षात आली. प्रथमतः सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच याविषयी आम्‍हाला जाणीव करून दिली.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. स्‍वतःची छायाचित्रे अस्‍पष्‍ट दिसण्‍याच्‍या संदर्भात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ते प्रत्‍यक्षात तसेच दिसत असल्‍याविषयी साधकांकडून करवून घेतलेले प्रयोग !

१ अ. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांनी ग्रंथांसाठी छायाचित्रांमध्‍ये सुधारणा करतांना इतरांच्‍या तुलनेत त्‍यांची स्‍वतःची छायाचित्रे अस्‍पष्‍ट दिसत असल्‍याची जाणीव करून देणे : ‘वर्ष २०१८-२०१९ मध्‍ये ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांच्‍या विविध छायाचित्रांच्‍या संदर्भाने सेवा चालू होती. तेव्‍हा काही छायाचित्रांमध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर अस्‍पष्‍ट दिसायचे. त्‍यामुळे ते आम्‍हाला छायाचित्रांमध्‍ये सुधारणा करायला सांगायचे. छायाचित्रांमध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर सुस्‍पष्‍ट दिसावेत; म्‍हणून आम्‍हाला संगणकामध्‍ये त्‍यांवर सुधारणा कराव्‍या लागल्‍या. त्‍या काळात छायाचित्रांच्‍या संदर्भाने सेवा करतांना लक्षात आले की, वर्ष २०१६ नंतर काढलेल्‍या सर्वच छायाचित्रांमध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चर्या (चेहरेपट्टी) छायाचित्रातील अन्‍य साधकांच्‍या तुलनेत अस्‍पष्‍ट दिसते. विशेषतः त्‍यांच्‍या देहाची कड अस्‍पष्‍ट दिसते. काही छायाचित्रांमध्‍ये त्‍यांचे हात त्‍यांच्‍या तोंडवळ्‍याच्‍या तुलनेत अधिक अस्‍पष्‍ट दिसतात, तर काही छायाचित्रांमध्‍ये त्‍यांचे डोळे तोंडवळ्‍याच्‍या तुलनेत अधिक अस्‍पष्‍ट दिसतात.’
– कु. भाविनी कापडिया आणि सौ. जान्‍हवी शिंदे, फोंडा, गोवा. (१८.७.२०२२)

१ आ. दैनिकातील साधकांची छायाचित्रे दाखवून त्‍याच दैनिकातील त्‍याच पृष्‍ठावरील स्‍वतःचे छायाचित्र मात्र अस्‍पष्‍ट असल्‍याचे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांनी लक्षात आणून देणे : ‘वर्ष २०१९ मध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये छापून आलेले त्‍यांचे छायाचित्र आणि त्‍याच पृष्‍ठावर असलेली अन्‍य साधकांची छायाचित्रे दाखवून ‘त्‍या साधकांप्रमाणे माझे छायाचित्र सुस्‍पष्‍ट दिसत नाही’, असा निरोप आम्‍हाला पाठवत असत. आम्‍ही ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांच्‍या छायाचित्रात काही त्रुटी आहेत का ?’, याचा अभ्‍यास करत असू. छायाचित्र चांगल्‍या प्रकारे आणि सुस्‍पष्‍ट छापून येण्‍यासाठी त्‍यात आवश्‍यक त्‍या सुधारणाही करत असू; परंतु तरीही मूळ छायाचित्र अधिक सुस्‍पष्‍ट होऊ शकत नसे. अजूनही मध्‍ये मध्‍ये ‘माझे छायाचित्र सुस्‍पष्‍ट छापून आले नाही’, असे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर कळवतात.’
– कु. पूजा नलावडे आणि कु. सायली डिंगरे (१८.७.२०२२)

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१ इ. चित्रीकरणामध्‍ये, तसेच छायाचित्रांमध्‍ये स्‍वतःच्‍या देहाच्‍या कडा अस्‍पष्‍ट दिसत असल्‍याचे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगणे आणि स्‍वतः प्रयोग करवून घेऊन ते तसेच असल्‍याविषयी निश्‍चिती करणे : ‘काही वर्षांपूर्वी आम्‍ही केलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांचे चित्रीकरण पडताळतांना ते ‘माझा तोंडवळा चित्रीकरणात अस्‍पष्‍ट दिसतो’, असे कळवत असत. यासंदर्भात आम्‍ही तांत्रिक बारकावे त्‍या त्‍या वेळी पहात असू; पण आम्‍हाला कोणतीच तांत्रिक अडचण लक्षात येत नसे. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांचा चेहरा अस्‍पष्‍ट का दिसतो ?’, याचा उलगडा आम्‍हाला जानेवारी २०२० मध्‍ये त्‍यांचे एक चित्रीकरण करत असतांना झाला. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या मार्गदर्शनाचे एक चित्रीकरण चालू होते. त्‍या वेळी त्‍याचे काही ‘शॉट्‍स’ (भाग) त्‍यांच्‍याकडून पडताळून घेतांना त्‍यांनी ते स्‍वतः चित्रीकरणात धूसर दिसत असल्‍याचे सांगितले. त्‍या वेळी आम्‍ही छायाचित्रकाच्‍या सर्व तांत्रिक बाबी पडताळल्‍या; परंतु त्‍यासंदर्भात कोणतीच चूक झाली नव्‍हती. त्‍या वेळी त्‍यांनी प्रयोग म्‍हणून तेथे सेवा करत असलेल्‍या एका साधिकेसह स्‍वतःचे चित्रीकरण करण्‍यास सांगितले. त्‍या वेळी चित्रीकरणात साधिका सुस्‍पष्‍ट दिसत होती; परंतु सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर अस्‍पष्‍ट दिसत होते. ‘चित्रीकरणात ते अस्‍पष्‍ट दिसतात, तर छायाचित्रात ते कसे दिसतात ?’, हे आम्‍ही त्‍यांचे प्रत्‍यक्ष छायाचित्र काढून पडताळले. तेव्‍हा छायाचित्रातही सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर अस्‍पष्‍टच दिसत होते. छायाचित्रकात काही अडचण नाही, याची निश्‍चिती झाल्‍यावर त्‍यांनी आणखी काही प्रयोग करून पाहिले. ‘डावा हात किती अस्‍पष्‍ट दिसतो ?’, ‘उजवा हात किती प्रमाणात अस्‍पष्‍ट दिसतो ?’, असे वेगवेगळे प्रयोग करून त्‍यांच्‍या शरिराचे कोणते कोणते अवयव किती प्रमाणात अस्‍पष्‍ट दिसतात, याचा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांनी अभ्‍यास केला. त्‍या प्रयोगांती लक्षात आले की, त्‍यांचा डावा हात उजव्‍या हाताच्‍या तुलनेत अधिक अस्‍पष्‍ट दिसतो.

विशेष म्‍हणजे त्‍या वेळी चालू असलेले तातडीचे चित्रीकरण थांबवून त्‍यांनी आमच्‍याकडून हे प्रयोग करवून घेतले होते.’
– श्री. केदार नाईक आणि श्री. अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.७.२०२२)

२. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या देहातील निर्गुण तत्त्व वृद्धींगत होत असल्‍याने ते अस्‍पष्‍ट दिसत असल्‍याचे लक्षात येणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांचे छायाचित्र अस्‍पष्‍ट किंवा धूसर दिसत असल्‍याच्‍या संदर्भात त्‍यांनीच अभ्‍यास करून घेतल्‍यावर ‘यामागे आध्‍यात्मिक कारण असू शकते’, असे आमच्‍या लक्षात आले. ‘काळानुसार आणि कार्याच्‍या आवश्‍यकतेनुसार सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आता वेगाने निर्गुणाकडे वाटचाल होत आहे. त्‍यामुळे त्‍यांचा देह अस्‍पष्‍ट दिसणे आणि त्‍यांच्‍या देहाची कड धूसर दिसणे’, अशा प्रकारचे पालट दिसून येत आहेत’, हे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांचे निराळे आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्य या अभ्‍यासातून उलगडले. काही छायाचित्रांत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे डोळे इतर अवयवांच्‍या तुलनेत अधिक अस्‍पष्‍ट दिसतात, तर काही छायाचित्रांत त्‍यांचे हात अधिक धूसर दिसतात. यासंदर्भात सनातनच्‍या सूक्ष्मातून ज्ञान प्राप्‍त करणार्‍या साधकांना ईश्‍वराकडून मिळालेल्‍या ज्ञानातही अशाच प्रकारचे उत्तर मिळाले. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीही चित्रीकरण करणार्‍या साधकांना सांगितले, ‘अलीकडे माझा तोंडवळा अस्‍पष्‍ट दिसतो, यात तुमची काही चूक नाही. देहाची निर्गुणाकडे वाटचाल होत असल्‍यामुळे माझ्‍यात हा आध्‍यात्मिक पालट होत आहे.’ संतांचे डोळे, हात आणि चरण यांतून त्‍यांच्‍यात जे तत्त्व अधिक आहे, त्‍याचे मोठ्या प्रमाणात प्रक्षेपण होत असते. आता सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या देहातून निर्गुण तत्त्वाचे प्रक्षेपण होत असल्‍याने अनेक छायाचित्रांत त्‍यांचा चेहरा, हात आणि चरण हे अधिक प्रमाणात अस्‍पष्‍ट जाणवतात.

३. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यातील निर्गुण तत्त्वाच्‍या संदर्भातील प्रत्‍यक्ष उदाहरणे

३ अ. छायाचित्रात तोंडवळा आणि हात अस्‍पष्‍ट दिसणे : उदाहरणादाखल छायाचित्र क्रमांक १ पहावे. वास्‍तविक श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍याहून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अंगकांती उजळ आहे. तरीही छायाचित्रात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या तुलनेत श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या अधिक सुस्‍पष्‍ट दिसतात, तर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा तोंडवळा आणि हात अस्‍पष्‍ट दिसतात. तसेच सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा तोंडवळा पारदर्शकही जाणवतो.

३ आ. छायाचित्रात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्‍तित्‍व न जाणवणे : ‘छायाचित्र क्रमांक २’ या ३ जानेवारी २०२२ या दिवशी काढलेल्‍या छायाचित्रात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या देहातून अधिक प्रमाणात पांढरा प्रकाश प्रक्षेपित होतांना दिसतो. त्‍या प्रकाशामुळे आपले डोळे दिपून काही वेळाने आपल्‍याला त्‍यांचे अस्‍तित्‍वच जाणवत नाही. ते शरिराने त्‍या ठिकाणी असले, तरी ‘ते तिथे नाहीतच’, असे वाटते. त्‍यांचा वर्ण गोरा असला, तरी या छायाचित्रात त्‍यांचे मुखमंडल गोर्‍या वर्णाच्‍याही पुढे जाऊन अत्‍यंत प्रकाशमान आणि दिव्‍य दिसते.

४. विविध नाडीपट्ट्यांमध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या निर्गुण स्‍थितीविषयी आलेले उल्लेख !

४ अ. भृगु जीवनाडी : वर्ष २०१९ मध्‍ये चेन्‍नई (तमिळनाडू) येथील भृगु जीवनाडीवाचक श्री. सेल्‍वम्‌गुरुजी यांच्‍या माध्‍यमातून महर्षि भृगु यांनीही ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले जीवनमुक्‍त आहेत, तरीही साधकांसाठी शेवटच्‍या श्‍वासापर्यंत कार्यरत रहाणार आहेत. पुढे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आत्‍म्‍याशी अधिकाधिक एकरूप होऊन, म्‍हणजे अधिकाधिक निर्गुण स्‍थितीत कार्य करणार आहेत’, असे सांगितले आहे.

४ आ. सप्‍तर्षी जीवनाडी : सप्‍तर्षींनीही वर्ष २०१७ मध्‍येच ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पुढे समाधी-अवस्‍था असेल. तेव्‍हा ते निर्गुण स्‍थितीत कार्य करतील. कार्यांप्रमाणे त्‍यांच्‍या अवस्‍था पालटतील’, असे सांगितले आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अलीकडच्‍या काळातील छायाचित्रे पाहिली की, महर्षींच्‍या वचनाची प्रचीती येते.

‘उच्‍च आध्‍यात्मिक स्‍तर असलेल्‍या संतांच्‍या देहात कशा प्रकारे बुद्धीअगम्‍य पालट होतात’, हे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या माध्‍यमातून अखिल मानवजातीला कळून येत आहे. त्‍यांच्‍या माध्‍यमातून अध्‍यात्‍मातील हे नवे नवे सिद्धांत प्रत्‍यक्षात अनुभवता येत आहेत. यासाठी आम्‍ही सर्व साधक त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२०.७.२०२२)

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे दिव्‍य आणि तेजस्‍वी रूप !

‘पांडुरंगकांती दिव्‍य तेज झळकती ।
रत्नकीळ (टीप) फांकती प्रभा ॥

अगणित लावण्‍य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथीची शोभा ॥

टीप : रत्नकीळ म्‍हणजे ‘रत्नांमधून बाहेर पडणारे किरण’

या संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍या पंक्‍तींची सनातनचे साधक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या रूपात तंतोतंत प्रचीती घेत आहेत.

१. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्‍य रूप पाहून पहाणारा स्‍तंभित होणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या गेल्‍या काही वर्षांतील छायाचित्रांत त्‍यांची कांती अत्‍यंत तेजस्‍वी दिसते. सामान्‍यतः गोरा वर्ण असणार्‍यांचे गोरेपण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गोरेपण यांत गेल्‍या काही वर्षांपासून पुष्‍कळच भेद दिसून येत आहे. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या गोरेपणात पांढरा प्रकाश दिसतो. मुळातच त्‍यांचे व्‍यक्‍तीमत्त्व उंच आणि भारदस्‍त आहे. त्‍यातच त्‍यांची अत्‍यंत तेजस्‍वी कांती पाहिली की, पहाणारा स्‍तंभित होतो. त्‍यांचे ते दिव्‍य रूप पाहून ‘न वर्णवे तेथीची शोभा ।’, अशीच पहाणार्‍याची स्‍थिती होते.

कु. सायली डिंगरे

२. पहाणार्‍याचे डोळे दीपतील, एवढा देह तेजस्‍वी दिसणे

गेल्‍या काही वर्षांतील त्‍यांच्‍या छायाचित्रांकडे पाहिल्‍यास ते इतके तेजस्‍वी दिसतात की, पहाणार्‍याचे डोळे क्षणभर दीपून जातात. त्‍यांचा तोंडवळा अस्‍पष्‍ट असतो; मात्र त्‍यांच्‍या संपूर्ण देहाकडे पाहिले, तर ‘छायाचित्र काढतांना त्‍यात प्रकाश (exposure) पुष्‍कळ अधिक झाला आहे कि काय ?’, असे वाटते. प्रत्‍यक्षात तांत्रिक त्रुटी नसते, तर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा देहच पुष्‍कळ प्रकाशमान झालेला असल्‍यामुळे छायाचित्र तसे दिसते. येथे दिलेले छायाचित्र पाहून तर ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे तेजाचा किंवा प्रकाशाचा एक गोळाच आहेत’, असे वाटते.

सामान्‍यतः व्‍यक्‍तीच्‍या डोळ्‍यांच्‍या खोलगट भागांत, नाकाची ठेवण असते तिथे गालांवर, तसेच हनुवटीखाली थोडी तरी सावली दिसून येते. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या तोंडवळ्‍यावर मात्र अशा सावल्‍या अल्‍प प्रमाणात दिसतात.

केवळ सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या संशोधक वृत्तीमुळे आम्‍हाला ‘साधनेने देहात देवत्‍व कशा प्रकारे जागृत होते’, हे अनुभवता येत आहे. त्‍यांच्‍या दिव्‍यत्‍वापुढे आम्‍ही सर्व साधक नतमस्‍तक आहोत. त्‍यांच्‍या दिव्‍य तेजाने केवळ त्‍यांची कांतीच नाही, तर सनातनच्‍या सहस्रो साधकांचे जीवनही साधनारूपी तेजाने उजळले आहे. या अनमोल कृपेसाठी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१८.७.२०२२)

तज्ञ, अभ्‍यासू आणि वैज्ञानिक दृष्‍टीने संशोधन करणारे यांना विनंती !

‘संतांचा देह आणि त्‍यांच्‍या वापरातील वस्‍तू यांतील बुद्धीअगम्‍य पालटांविषयी संशोधन करून त्‍यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्‍यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. त्‍यांच्‍यासाठी

१. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची छायाचित्रे अस्‍पष्‍ट दिसण्‍यामागे काय कारण आहे ?
२. छायाचित्रात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्‍तित्‍व न जाणवण्‍यामागे काय कारण आहे ?
३. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अंगकांती इतर गोर्‍या वर्णाच्‍या व्‍यक्‍तींपेक्षा अधिक उठावदार का दिसते ?
४. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या देहातून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होतांना का दिसतो ?

या संदर्भात तज्ञ, अभ्‍यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्‍टीने संशोधन करणारे यांचे साहाय्‍य आम्‍हाला लाभल्‍यास आम्‍ही कृतज्ञ असू.’

– व्‍यवस्‍थापक
संपर्क : श्री. आशिष सावंत
ई-मेल : [email protected]

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक