सकाळी उठल्यावर येणार्‍या शिंका

१. थंड हवा हेही शिंकांचे कारण असू शकणे 

‘काही वेळा सकाळी उठल्यावर नाक चोंदलेले असते आणि भरपूर शिंका येत रहातात. या वेळी ‘आपल्याला ‘कोरोना’, तर झालेला नाही ना !’, असे वाटून काही जण घाबरून जातात. ‘शिंका येण्याचे कारण प्रत्येक वेळी कोरोनाच असते’, असे नाही. रात्रीच्या थंड वार्‍यामुळे नाक चोंदणे, हेही एक प्राथमिक कारण असू शकते. थंड वार्‍यामुळे नाकाच्या अस्थीविवरामधून (सायनसमधून) वाहणारा द्रव चोंदून रहातो. श्वसनमार्गातील हा अडथळा दूर व्हावा, यासाठी शिंका येतात. काही वेळा झोपल्यावर तोंड उघडे रहाते आणि नाक चोंदल्यावर तोंडाने श्वासोच्छ्वास चालू होतो. अशा वेळी घशाला थंड हवा लागल्याने घसा तांबडा होतो.

२. शिंका येत असल्यास करायचे उपाय

वैद्य मेघराज पराडकर

सकाळी उठल्यावर शिंका येत असल्यास, तसेच घसा तांबडा होऊन जबड्याच्या सांध्याच्या मुळाशी दाबल्यावर दुखत असल्यास नाक, कान, गळा, तसेच जबड्याच्या सांध्याच्या मुळाकडील भाग यांवर शेक द्यावा. शेक देण्यासाठी गरम पिशवी (हिटिंग पॅड) वापरावी. पाण्याची वाफ घेण्यापेक्षा अशा प्रकारे कोरडा शेक दिल्याने अधिक लाभ होतो. यानंतर नाक शिंकरल्याने चोंदलेला द्रव पदार्थ बाहेर पडून जातो. श्वसनमार्गातील अडथळा दूर झाल्यावर शिंका येणे थांबते.

३. प्रतिबंधात्मक उपाय 

शिंका येऊच नयेत, यासाठी रात्री झोपतांना डोक्याभोवती पांघरूण घेऊन झोपावे. कानात कापसाचे बोळे घालावेत. नाकाला आतील बाजूने तेल लावावे. रात्री झोपतांना दूध किंवा पाणी पिणे टाळावे. पाणी प्यायचेच असल्यास घोटभर पाणी प्यावे.’

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, गोवा. (११.७.२०२२)