उत्तर आणि पूर्वोत्तर भारत क्षेत्रात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित ‘ऑनलाईन’ बैठकांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – गुरुपौर्णिमेचा समाजातील अधिकाधिक लोकांना लाभ व्हावा, तसेच गुरुपौर्णिमेचे महत्त्व समाजामध्ये पोचवण्याच्या कार्यात समाजाचाही सहभाग व्हावा, या उद्देशाने उत्तर आणि पूर्वोत्तर भारत क्षेत्रातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत अधिवक्ता, पत्रकार, हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी, आणि जिज्ञासू यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ बैठका घेण्यात आल्या. या बैठकीमध्ये उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड, बंगाल, आसाम आदी राज्यांतील जिज्ञासू जोडलेले होते. या बैठकांमध्ये ‘जीवनातील गुरूंचे महत्त्व आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीकोनातून साधनेचे महत्त्व’, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

क्षणचित्रे

१. अनेक अधिवक्त्यांनी गुरुपौर्णिमेचा प्रसार आणि प्रसिद्धी यांच्या सेवेत सहभाग घेतला.

२. अनेक धर्मप्रेमी सुटी घेऊन गुरुपौर्णिमेच्या प्रसारकार्यात सहभागी झाले.

वैशिष्ट्यपूर्ण

‘धर्मकार्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकले, तर देव साहाय्य करतो’, याविषयी वाराणसी येथील श्री. वीरेंद्र वर्मा यांनी त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, ‘‘मी सेवेसाठी सुटीचे आवेदन दिले होते. मला कार्यालयात सांगण्यात आले की, सुटी हवी असल्यास चाकरी सोडावी लागेल. तेव्हा ‘चाकरी गेली, तरी चालेल; पण गुरुपौर्णिमेची सेवा करायची’, असा निर्धार केला आणि चाकरीचे त्यागपत्र दिले. त्याच दिवशी मला घराजवळच अजून चांगली चाकरी मिळाली.’’