लहान मुले सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर मग न्यायमूर्ती ९ वाजता कामकाजाला प्रारंभ का करू शकत नाहीत ?

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू.यू. ललित यांचा प्रश्‍न !

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू.यू. ललित

नवी देहली – जर लहान मुले सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर मग न्यायमूर्ती आणि अधिवक्ते ९ वाजता कामकाजाला प्रारंभ का करू शकत नाहीत?, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू.यू. ललित यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी विचारला. न्यायमूर्ती ललित यांनी १५ जुलै या दिवशी त्यांच्याकडील सुनावणीला न्यायालयाच्या नियोजित वेळेच्या एक घंटा आधी प्रारंभ केला. तेव्हा त्यांनी वरील मत मांडले. सर्वोच्च न्यायालयात कामकाजाचा प्रारंभ सकाळी १०.३० वाजता होतो. सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत न्यायालयात सुनावण्या होत असतात. यात दुपारी १ ते २ मध्ये जेवणाची सुटी असते. नेहमी १०.३० वाजता प्रारंभ होणार्‍या न्यायालयात न्यायमूर्ती ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने ९.३० च्या सुमारास सुनावणीला प्रारंभ केला.