देशातील २५ राज्यांत पावसामुळे २१८ जणांचे बळी : सर्वत्र जनजीवन विस्कळीत

  • देशात आतापर्यंत सरासरीहून ११ टक्के अधिक पाऊस

  • तेलंगाणात विक्रमी ६८.२ मिमी, महाराष्ट्रात ४३ मिमी, तर छत्तीसगडमध्ये ३५.८ मिमी पावसाची नोंद

नवी देहली – महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांत पूरस्थिती आणि दरड कोसळणे यांमुळे २१८ जण मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांसह देशातील २५ राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरातमध्ये मागील २४ घंट्यांत पावसाशी संबधित घटनांत १४ जणांचा, तर महाराष्ट्रात आतापर्यंत ८४ जणांचा बळी गेला आहे.  देशात आतापर्यंत सरासरीहून ११ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तेलंगाणात विक्रमी ६८.२ मिमी,  महाराष्ट्रात ४३ मिमी, तर छत्तीसगडमध्ये ३५.८ मिमी पावसाची नोंद झाली.

गुजरातमधील ५ जिल्ह्यांमध्ये अतीदक्षतेची सूचना

गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, जूनागड, गीर आणि सोमनाथ या ५ जिल्ह्यांना अतीदक्षतेची सूचना दिली आहे. संपूर्ण राज्यात आतापर्यंत ३१ सहस्र लोकांना  सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ८३ जणांचा बळी गेला आहे.

मध्यप्रदेशातील १६ जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे ६६ जणांचा मृत्यू

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार भोपाळमध्ये आतापर्यंत २२.८२ इंच पाऊस झाला. हा आकडा आतापर्यंतच्या सरासरी पावसाहून अधिक आहे. इंदूरमध्ये मागील २४ घंट्यांत जवळपास ३ इंच विक्रमी पावसाची नोंद झाली. बैतूल आणि हरदा जिल्ह्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. राज्यातील नर्मदा नदी धोक्याच्या पातळीवरून वहात आहे. राज्यातील नर्मदापुरम विभाग, खांडवा, बुर्‍हाणपूर या शहरांमध्ये अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.