१. ‘जोगवा’ नृत्य
१ अ. एका सुप्रसिद्ध गीतावर ‘जोगवा’ नृत्य करणे
१ अ १. मनावर त्रासदायक शक्तीचे आवरण येऊन ते निरुत्साही होणे : या गीतावर नृत्याचा सराव करतांना माझे मन निरुत्साही झाले. त्यातील मुद्रा आणि पायांच्या हालचाली बसवतांना ‘माझ्या मनावर त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण येऊन कंटाळा येत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
१ अ २. आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र या ठिकाणी दाब जाणवणे अन् परात्पर गुरुदेव आणि श्री भवानीदेवी यांना आत्मनिवेदन केल्यानंतर ‘स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे जाणवणे : २ – ३ वेळा हे नृत्य केल्यानंतर मला माझे आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र या ठिकाणी दाब जाणवला. ‘हे नृत्य करायला नको’, असे मला वाटत होते. सराव करत असतांना ‘मी आणि माझी मोठी बहीण अंजलीताई (कु. अंजली कानस्कर, वय २३ वर्षे) नृत्याचा सराव करत असलेल्या ठिकाणाकडे अनिष्ट शक्ती पहात असून ती तेथे त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण करत आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर मी परात्पर गुरुदेव आणि श्री भवानीदेवी यांना आत्मनिवेदन केल्यानंतर मला चांगले वाटले. त्या वेळी ‘माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.
१ अ ३. त्रासदायक शक्तीचे पुष्कळ आवरण येऊन दाब जाणवणे आणि सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर थोडे बरे वाटू लागणे : या नृत्याचा सराव केल्यानंतर माझ्यावर त्रासदायक शक्तीचे पुष्कळ आवरण आले आणि मला दाब जाणवला. त्या वेळी मला सद्गुरु गाडगीळकाकांनी जे नामजपादी उपाय करण्यास सांगितले, ते मी पूर्ण केले. त्यानंतर मला थोडे बरे वाटू लागले.
१ अ ४. सरावानंतर आनंद जाणवत नसल्याने निराशा येणे आणि भावाच्या स्तरावर विचार केल्यावर मन सकारात्मक होणे : या नृत्याच्या सरावानंतर आनंद जाणवत नसल्याने मला निराशा आली; परंतु ‘परात्पर गुरुदेवांनी आपल्याला प्रयोगात नृत्य करण्याची संधी दिली आहे आणि अशा गीतांवर नृत्य केल्याने काय परिणाम होतात ?, हे लक्षात आणून दिले. या प्रयोगांच्या माध्यमातून गुरुदेवच माझ्याकडून सेवा करवून घेत आहेत’, असे विचार मनात येऊन माझे मन सकारात्मक झाले.
१ आ. ‘आईचा जोगवा…’ या गीतावर ‘जोगवा’ नृत्य करणे
१ आ १. नृत्य करतांना त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होऊन ‘स्वतःभोवती श्री भवानीदेवीचे संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे जाणवणे : ‘आईचा जोगवा…’ या गाण्यावर नृत्य करतांना एका प्रसिद्ध गीतावर नृत्य केल्यानंतर ‘माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण नष्ट होऊन माझ्या शरिरात चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवले. नृत्याचा सराव करतांना आणि सराव केल्यानंतर ‘श्री भवानीदेवीचे संरक्षककवच माझ्या भोवती निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.
१ आ २. नृत्य केल्यावर थकवा न जाणवणे : आधी अनेक वेळा नृत्य केल्यावर मला थकवा जाणवायचा; परंतु या गीतावर अनेक वेळा नृत्य करूनही मला थकवा जाणवत नव्हता.
१ आ ३. नृत्य करतांना आरंभी मला माझ्या मणिपूरचक्राच्या ठिकाणी दाब जाणवला. नंतर तो दाब हळूहळू न्यून होऊन नाहीसा झाला.
१ आ ४. यानंतर माझ्या सहस्रारावर आणि अनाहतचक्र या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवल्या.
१ आ ५. ‘सर्वत्र पिवळा आणि गुलाबी प्रकाश पसरत आहे’, असे मला दिसले.
१ आ ६. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे प्रयोगानंतर मला कोणताही शारीरिक त्रास झाला नाही; याउलट माझे मन अधिक उत्साही आणि आनंदी होते.
१ आ ७. नृत्य करतांना डोळ्यांसमोर श्री भवानीदेवीचे तारक रूप येऊन भावजागृती होणे : नृत्य करतांना मला त्या गाण्यातील भाव अनुभवता येत होता. त्या वेळी मला चैतन्य आणि श्री भवानीदेवी यांच्याप्रती शरणागतभाव जाणवत होता. नृत्य करतांना माझ्या डोळ्यांसमोर श्री भवानीदेवीचे तारक रूप येऊन माझी भावजागृती झाली. ‘श्री भवानीमाता माझे नृत्य पहात आहे’, असे मला जाणवले.
२. श्रीकृष्णाचे वर्णन असलेल्या श्लोकावर ‘वंदना’, हे नृत्य करतांना आणि श्रीकृष्णाशी संबंधित चित्रपट गीतांवर नृत्य करतांना जाणवलेली सूत्रे
२ अ. मी श्रीकृष्णाचे वर्णन असलेला श्लोक किंवा स्तोत्र यांवर ‘वंदना’, हे नृत्य करते, तेव्हा मला आनंद आणि भाव जाणवतो.
२ आ. श्रीकृष्णाशी संबंधित एका चित्रपट गीतावर नृत्य करतांना मन बहिर्मुख होणे आणि नृत्य करतांना मिळणारा आनंद वरवरचा असल्याचे जाणवणे : या चित्रपट गीतावर नृत्य करतांना माझ्या मनाची स्थिती काही प्रमाणात बहिर्मुख झाली. मला अंतर्मुखतेतील आनंद अनुभवता येत नव्हता. या गीतावर नृत्य करतांना आरंभी ‘मी श्रीकृष्णाच्या समोर नृत्य करत आहे’, असा भाव ठेवला होता; परंतु तो भाव मला संपूर्ण नृत्यात अनुभवता आला नाही. त्यामुळे नृत्य झाल्यावर त्या वेळी जाणवणारा उत्साह आणि आनंद वरवरचा वाटत होता.
२ इ. दुसर्या चित्रपट गीतावर नृत्य करतांना मन अस्थिर होऊन चिडचिड होणे : दुसरे चित्रपट गीत ऐकून ‘ते केवळ मनोरंजनासाठी आहे’, असे मला वाटले. या नृत्यात मी समोरच्या बाजूने स्त्रीची, तर पाठच्या बाजूने पुरुषाची वेशभूषा केली होती. त्यामुळे नृत्यसराव करतांना मला शारीरिक त्रास झाला. मला नृत्यातील भाव अनुभवता न येता त्यातील हालचाली आणि वेशभूषा यांकडे माझे लक्ष जात होते. हे नृत्य करतांना माझे मन अस्थिर होऊन माझी चिडचिड होत होती.
२ ई. तिसर्या चित्रपट गीतावर नृत्य करतांना स्वतःभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण जाणवून सात्त्विक ऊर्जा नष्ट होत असल्याचे जाणवणे : या चित्रपट गीतावर नृत्य करण्यापूर्वी मी २ – ३ वेळा हे गीत ऐकले. त्या वेळी मला माझ्याभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण असल्याचे जाणवले. नृत्य करतांना ‘माझ्यातील सात्त्विक ऊर्जा नष्ट होत आहे’, असे मला जाणवले. नृत्य झाल्यानंतर मला माझ्या षट्चक्रांच्या ठिकाणी दाब आणि त्रासदायक शक्तीचे आवरण जाणवत होते.
३. ‘कालबेलीया’ हे राजस्थानी लोकनृत्य करतांना माझे पूर्ण लक्ष नृत्यातील हालचालींकडेच जात होते. त्यामुळे मला नृत्यातील कोणताच भाव अनुभवता आला नाही.
४. विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य केल्यावर साधिकेच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया
नृत्यकला ईश्वरप्राप्तीसाठी आहे. ‘ज्या नृत्यातून आपल्याला सात्त्विक स्पंदने ग्रहण करता येतात आणि आपल्याला देवाशी एकरूप होता येते, ते खरे नृत्य आहे’, असे मला वाटले. रज-तम प्रधान चित्रपट गीतांवर नृत्य केल्याने आपला साधनेचा अमूल्य वेळ आणि आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी ईश्वराने दिलेली दैवी ऊर्जा वाया जाते अन् आपल्याला आध्यात्मिक स्तरावर त्रास होतो. रज-तम प्रधान चित्रपट गीतांवर नृत्य करणे, हे खरे नृत्य नाही. जेव्हा आपण नृत्याला भावाची जोड देतो आणि स्वतःच्या अस्तित्वाला विसरून देवाला अनुभवण्यासाठी नृत्य करतो, तेव्हा नृत्यातून आपली साधना होते. ‘चित्रपट गीत किंवा शुद्ध शास्त्रीय गाणे यांना ‘रिमिक्स’ करून ‘ते भक्तीगीत आहे’, असे भासवून त्यावर नृत्य करणे’, हे देवाला आवडेल का ? ‘अशा गीतांवर नृत्य करण्यापेक्षा शास्त्रीय गीते आणि देवतांवर आधारित गीते यांवर नृत्य केल्याने आपल्याला त्यातून देवतेचे तत्त्व ग्रहण करता येऊ शकते, तसेच खरा आनंद मिळतो’, असे मला वाटले.
‘हे गुरुदेवा, ‘आपल्या कृपेमुळे सात्त्विक गीते आणि चित्रपट गीते यांवर नृत्य केल्यावर होणारा परिणाम मला अनुभवता आला’, याबद्दल मी आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. शर्वरी कानस्कर (वय १५ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.८.२०२१)
|