श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे मालदीवमध्ये !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना मालदीवने शरण दिल्यानंतर मालदीवमध्ये राष्ट्रपती इब्राहिम सालेह यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात येत आहेत. राजपक्षे यांना पुन्हा श्रीलंकेत पाठवून देण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजपक्षे सिंगापूर येथे जाण्याची शक्यता आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी मालदीवचे माजी राष्ट्रपती आणि आताचे संसदेचे सभापती महंमद नशीद यांनी साहाय्य केले. नशीद यांच्या साहाय्यावरून मालदीव सरकारने राजपक्षे यांचे विमान मालदीवमध्ये उतरण्यास अनुमती दिली.

श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा

संतप्त नागरिक पंतप्रधानांच्या कार्यालयात घुसले !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेत आता आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. सहस्रो लोक राजधानी कोलंबोच्या रस्त्यांवर उतरले. यांतील बरेच जण संसद भवनात घुसले. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये चकमकी झाल्या. या पार्श्वभूमीवर हंमामी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणीची घोषणा केली.

१. दुसरीकडे श्रीलंकेच्या एअरफोर्स मीडिया डायरेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे, त्यांची पत्नी आणि दोन सुरक्षारक्षक यांना मालदीवला जाण्याची अनुमती दिली होती. यासाठी संरक्षण मंत्रालयाने सर्व गोष्टींची पूर्तता केली होती. १३ जुलैला सकाळी वायूदलाकडून त्यांना विमान उपलब्ध करून देण्यात आले.

२. गोटाबाया राजपक्षे यांनी १३ जुलैला त्यागपत्र देण्याची घोषणा केली होती; मात्र १२ जुलैलाच त्यांनी त्यागपत्रावर स्वाक्षरी केल्याची माहिती आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍याकडे त्यागपत्र सोपवण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी हे त्यागपत्र संसद अध्यक्षांकडे सुपुर्द करील, अशी माहिती आहे.

राजपक्षे यांना पलायन करण्यास साहाय्य केल्याचे वृत्त भारताने फेटाळले !

भारताने राजपक्षे यांना श्रीलंकेतून पलायन करण्यास साहाय्य केल्याचे वृत्त प्रसारित झाल्यावर भारताच्या श्रीलंकेतील उच्चायुक्तालयाने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना श्रीलंकेतून बाहेर जाण्यासाठी भारताने साहाय्य केल्याच्या प्रसारमाध्यमांमधील निराधार बातम्यांचे भारतीय उच्चायुक्तालय खंडण करते. ‘भारत श्रीलंकेतील नागरिकांना पाठिंबा देणे चालूच ठेवील’, याचा आम्ही पुनरुच्चार करतो. श्रीलंकेतील नागरिक समृद्धी आणि प्रगती यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोकशाही मार्गाने लोकशाही संस्था अन् घटनात्मक चौकटीच्या साहाय्याने प्रयत्न करत आहेत.