१३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. ७ जुलै २०२२ या दिवशी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मोत्सव असतो. या दुग्धशर्करायोगाच्या निमित्ताने ७.७.२०२२ या दिवशी झालेल्या विशेष भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘सनातनच्या दैवी गुरुपरंपरेतील दैवी गुरु-शिष्यांची दैवी गाथा’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे संक्षिप्त चरित्र, प.पू. भक्तराज महाराज यांची त्यांचे परमशिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांच्यावर असलेली कृपा, तसेच ते त्यांच्याकडून करवून घेत असलेले कार्य’, यांविषयी सांगून गुरुतत्त्वाचे माहात्म्य उलगडले. या सत्संगात आलेल्या दैवी अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना प्रत्यक्ष गुरुतत्त्वाच्या अस्तित्वाची प्रचीती आली.
१. गुलाबाच्या फुलांचा सुगंध येणे
१ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सत्संगापूर्वी सत्संगाची सूत्रे वाचत असतांना गुलाबाच्या फुलांचा सुगंध येत होता.
१ आ. भक्तीसत्संगात भावार्चना करतांना गुलाबाच्या फुलांचा पुष्कळ सुगंध येणे : या भक्तीसत्संगात ‘गुरुतत्त्व कार्यरत आहे’, अशी अनुभूती घेऊया’, अशी भावार्चना करण्यात आली. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी भावार्चना घेतांना ‘आता आपल्याला गुलाबाच्या फुलांचा मंद सुगंध येत आहे’, असे म्हटल्यावर खरेच गुलाबाच्या फुलांचा मनमोहक सुगंध येऊ लागला. नंतर त्या पुढील भावार्चना सांगत असतांना गुलाबाच्या फुलांचा सुगंध अधिक तीव्रतेने येऊ लागला. त्या प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्याविषयी सांगत असतांना तो सुगंध अखंड येत होता. त्या सुगंधामुळे प.पू. बाबांची पुष्कळ आठवण येऊन त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती येत होती.
१ इ. अन्य कुठल्याही सत्संगात कुठलीही अनुभूती न येणार्या तीव्र त्रास असणार्या एका साधिकेलाही या भक्तीसत्संगात गुलाबाच्या फुलांचा सुगंध अनुभवता येणे : अन्य वेळी भक्तीसत्संग ऐकतांना आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या एका साधिकेला सत्संगातील सूत्रे आकलन होत नाहीत किंवा विशेष अनुभूती येत नाही; परंतु या भक्तीसत्संगात प.पू. बाबांविषयी भावार्चना चालू असतांना तिलाही गुलाबाच्या फुलांचा सुगंध अनुभवता आला.
१ ई. सत्संगात भारतभरातील मराठी भाषिक साधक ‘ऑनलाईन’ उपस्थित असतात. त्यांच्यापैकी २ – ३ साधकांनीही ‘गुलाबाच्या फुलांचा सुगंध येत आहे’, अशी अनुभूती सांगितली.
प.पू. भक्तराज महाराज यांना गुलाबाची फुले अतिशय प्रिय होती. या भक्तीसत्संगाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, आश्रमातील तीव्र त्रास असणार्या साधिका आणि ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकणारे काही साधक यांना गुलाबाच्या फुलांच्या सुगंधाची अनुभूती आली. गुरुतत्त्वाचे सर्वत्र अवतरण झाल्याची ही अनुभूती आहे. ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी सुगंधाच्या रूपाने सत्संगात उपस्थित राहून जगभरातील सर्व साधकांवर गुरुपौर्णिमेनिमित्त कृपाशीर्वादाचा वर्षाव केला’, असे मला जाणवले.
(‘या धारिकेचे संकलन करत असतांना मलाही गुलाबाच्या फुलांचा सुगंध येत होता.’ – श्रीमती आदिती देवल (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६४ वर्षे), रामनाथी, गोवा. (८.७.२०२२))
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी लाल गुलाबाच्या रंगाची साडी नेसणे
सनातनच्या गुरुपरंपरेत विराजमान असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी या दिवशी लाल गुलाबाच्या रंगाचीच साडी नेसली होती. हा केवळ योगायोग नसून ‘ही गुरुतत्त्वाच्या एकरूपतेचीच अनुभूती आहे’, असे मला जाणवले.
३. भक्तीसत्संगात गुरुपौर्णिमेच्या दिवसासारखे वातावरण अवतरल्याची अनुभूती येणे
गुरुपौर्णिमेच्या दिवशी जसे अत्यंत चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण असते, तसेच वातावरण या भक्तीसत्संगाच्या वेळीही अनुभवता आले. ‘आजच गुरुपौर्णिमा असून प्रत्यक्ष गुरुपूजनच चालू आहे’, असेच मला जाणवत होते.
४. भक्तीसत्संगाच्या वेळी आश्रमाच्या परिसरात गरुडांनी घिरट्या घालणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भक्तीसत्संगात सप्तर्षींनी प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रथम भेटीविषयी सांगितलेली सूत्रे सांगत असतांना एका साधकाला ‘रामनाथी आश्रमाच्या परिसरात ७ – ८ गरुड घिरट्या घालत आहेत’, असे दिसले. भक्तीसत्संगाच्या वेळी रामनाथी आश्रमाच्या परिसरात गरुडाने घिरट्या घालणे, म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् विष्णुस्वरूप अवतारी गुरु आहेत’, याची मिळालेली प्रचीती होय.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘हे गुरुराया, आपल्या परम कृपेने आम्हाला भक्तीसत्संगाद्वारे चराचरव्यापी गुरुतत्त्वाची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. आपल्या या दिव्य तत्त्वाला आमचे कोटीशः नमन ! हे गुरुनाथा, ‘विविध माध्यमांतून तुम्ही दिलेल्या गुरुतत्त्वाच्या या अनुभूतींतून ‘मी सतत तुमच्या समवेतच असतो’, असे तुम्ही आम्हाला आश्वस्त केले आहे’, याबद्दल आम्ही आपल्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.
‘आम्हाला सतत आपल्या परम तत्त्वाची अशीच अनुभूती घेता येऊ दे आणि त्याद्वारे मिळणार्या ऊर्जेच्या आधारे आमच्याकडून आपल्याला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न वाढू देत’, अशी आपल्या शरणागतवत्सल श्री चरणी आर्त प्रार्थना आहे.’
– कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |