‘परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) केवळ सनातन संस्थेतील साधकांचेच गुरु नसून ते अखिल विश्वाचे गुरु आहेत. १३.७.२०२२ या दिवशी असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त ‘संपूर्ण विश्वाच्या आध्यात्मिक सिंहासनावर विराजमान असलेल्या परात्पर गुरुदेवांचे तत्त्व अधिकाधिक अनुभवण्यासाठी आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी जाणून घेऊया.
१. गुरु-शिष्य यांचे अनमोल नाते !
गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्याच्या जीवनातील अत्यंत अनमोल आध्यात्मिक उत्सव ! शिष्यासाठी गुरु हेच माता आणि गुरु हेच पिता ! शिष्याच्या जीवनात गुरुच सर्वस्व असतात. गुरूंचे स्मरण हीच त्यांची पूजा आणि गुरूंचे स्मरण हीच साधना ! शिष्याच्या जीवनात गुरुच एकमात्र देवता असतात. गुरूंची भेट झाल्यापासून प्रत्येक क्षणी शिष्याला गुरूंचाच ध्यास लागलेला असतो आणि गुरूंना शिष्याच्या प्रगतीचाच ध्यास लागलेला असतो. ‘गुरूंना आनंद देणे’, हाच शिष्याचा विचार असतो आणि ‘शिष्याचा आनंद’ हाच गुरूंचा आनंद असतो. शिष्य स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी गुरूंच्या चरणी तन-मन-धन आणि प्रसंगी प्राण यांसहित संपूर्ण समर्पित होतो आणि त्याच्या समर्पणाने प्रसन्न होऊन गुरु आपल्या केवळ एका कृपाकटाक्षानेही शिष्याचा उद्धार करतात.
२. गुरुपौर्णिमेला केल्या जाणार्या गुरुपूजनाचा खरा अर्थ !
गुरुपौर्णिमेला गुरुपूजन केले जाते. गुरुपूजन म्हणजे केवळ गुरूंची पाद्यपूजा करणे नाही. गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूंनी दिलेले ज्ञान आत्मसात् करणे ! हे ज्ञान ग्रहण करून कृतीतही आणायचे असते. गुरूंनी आतापर्यंत आपल्याला जे ज्ञान दिले आहे, ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतांना ‘गुरूंनी आपल्यासाठी किती आणि काय काय केले आहे’, याचे स्मरण करावे ! ‘गुरूंचे आपल्यावर आभाळाएवढ्या असणार्या प्रचंड ऋणाचे कृतज्ञतेने अवलोकन करणे आणि या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा करणे (गुरूंना अपेक्षित असा अध्यात्मप्रसार करणे) अन् त्यांची कीर्ती सर्वदूर पसरवणे’, हेच खरे गुरुपूजन !
३. ‘समर्पितभावाने केलेली प्रत्येक सेवा’, हेच गुरुपूजन !
गुरुपौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षी ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन केले जाते. या वर्षीही गुरुकृपेने आपल्याला गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या अविस्मरणीय सेवांमध्ये सहभागी होऊन यथामती आणि यथाशक्ती स्वतःला पूर्णपणे गुरुसेवेत समर्पित करूया. ज्या गुरूंच्या चरणांत अवघे त्रिभुवन सामावले आहे, त्यांच्यासाठी आपला प्रत्येक श्वास समर्पित करूया. ‘समर्पितभावाने केलेली कोणत्याही प्रकारची गुरुसेवा’, हेच आपल्यासाठी गुरुपूजन आहे. समर्पितभावाने सेवा करून आपल्या आध्यात्मिक उत्कर्षाची अमूल्य सुवर्णसंधी असलेल्या या वर्षीच्या दिव्य गुरुपौर्णिमेचा परमोच्च आनंद लुटूया !
४. परात्पर गुरुदेवांच्या श्री चरणी प्रत्येक क्षणी कृतज्ञतेचा श्वास अर्पण करूया !
‘आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले, तरीही त्या प्रसंगात गुरुदेवांवर श्रद्धा ठेवल्याने त्या संकटांवर सहजतेने मात करता येते’, याची सहस्रो साधकांनी प्रचीती घेतली आहे. ज्या महान अवतारी गुरूंनी आपल्याला आतापर्यंत सर्व प्रकारची संकटे, पापे, सर्व प्रकारचे ताप आणि दुःख यांतून वाचवले आहे, या घोर कलियुगातील तीव्र आपत्काळातही साधनारूपी परम दिव्य संजीवनी प्रदान केली आहे, त्या महान गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच या वर्षीची गुरुपौर्णिमा आहे. आपल्याला प्राप्त झालेले हे जीवन परात्पर गुरुदेवांचीच कृपा आहे; म्हणूनच आपण सर्वांनी परात्पर गुरुदेवांच्या श्री चरणी प्रत्येक क्षणी कृतज्ञतेचा श्वास अर्पण करूया. या गुरुपौर्णिमेला विश्वपती गुरुदेवांच्या परम चरणी कोटी कोटी कृतज्ञतेची भावांजली समर्पित करूया !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (७.७.२०२२)