भारत भेटीच्या वेळी गोळा केलेली माहिती आय.एस्.आय.ला पुरवली !

भारताला ५ वेळा भेट देणार्‍या पाकिस्तानी पत्रकाराचा गौप्यस्फोट

नवी देहली – पाकिस्तानी लेखक नुसरत मिर्झा यांनी त्यांनी भारत भेटीच्या काळात  गोळा केलेली माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला पुरवली; मात्र पाकिस्तान सरकारने त्याचा योग्य तो वापर केला नाही, असा गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तानी पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक शकील चौधरी यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत मिर्झा यांनी ही माहिती उघड केली.

मिर्झा पुढे म्हणाले की,

१. माझ्या भारत भेटीच्या काळात मला पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अनेक लाभ मिळाले. खरे तर तुम्ही भारतात जाण्यासाठी जेव्हा व्हिसा घेता, तेव्हा तुम्हाला केवळ ३ ठिकाणी फिरण्याची अनुमती मिळते; मात्र खुर्शीद कसुरी परराष्ट्र मंत्री असतांना मला ७ ठिकाणी फिरण्याची अनुमती मिळाली होती.

२. मी अनेकदा भारतात जाऊन आलो आहे. मला भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि ‘मिली गॅझेट’ नियतकालिकाचे संपादक जफरूल इस्लाम यांनी आमंत्रित केले होते.   मी भारताला ५ वेळा भेट दिली. मी देहली, पाटलीपुत्र, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई आदी शहरांमध्ये जाऊन आलो आहे. वर्ष २०११ मध्ये देहली अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांचीही मी भेट घेतली, तसेच त्या वेळी देशातील ५६ मुसलमान खासदारांनाही भेटलो होतो. त्यांनी मला चांगले साहाय्य केले.

३. या भेटीत गोळी केलेली माहिती मी खुर्शीद यांना दिली होती. त्यांनी ती माहिती पाकिस्तानी सैन्यदलप्रमुखांना दिली. त्यानंतर सैन्यदलप्रमुखांनी मला आणखी माहिती गोळा करण्याची विनंती केली होती.

४. मी भारताची संस्कृती, तसेच भारताच्या दुर्बलतेचा अभ्यास केला होता. तसेच भारत देश म्हणून कशा प्रकारे काम करतो ?, भारतात मुसलमान कशा प्रकारे जगतात ?, काश्मीरमध्ये कशा प्रकारे फुटीरतावादी चळवळ चालते ? आदी माहिती मी गोळा केली होती. अनेक वृत्तवाहिन्यांचे संपादक आणि मालक यांच्याशीही माझी मैत्री होती.

५. एकंदरीतच भारत सरकारला घेरण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती मी आय.एस्.आय.ला दिली होती; मात्र पाकिस्तानी नेतृत्वाने या माहितीची योग्य तो वापर केला नाही.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानातून भारताच्या भेटीसाठी येणारे कोणत्या उद्देशाने येतात ?, हे यातून आता भारतियांच्या लक्षात आले असेल ! त्यामुळे पाकिस्तान्यांना भारतात येऊ द्यायचे का ? हे आता ठरवण्याची आवश्यकता आहे !