दैवी प्रवास करतांना भगवंताने बनवलेल्या निसर्गाची वैशिष्ट्ये सांगून स्वतःसमवेत सहसाधकांनाही भगवंताच्या चरणी लीन करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. भगवंताने पुष्कळ विचार करून ही सृष्टी बनवली असून त्याने मानवाला प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळे आणि फुले दिली असून देवाचे पुष्कळ कौतुक वाटत असल्याचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दैवी प्रवास करत असतांना नवीन झाडे, पक्षी, डोंगर, नद्या आणि फुले अशा निसर्गाविषयीच्या अनेक गोष्टींची पुष्कळ माहिती सांगतात. त्या म्हणतात, ‘‘निसर्ग हा देवाने दिलेला किती मोठा दैवी खजिना आहे. देवाकडे सर्व विनामूल्य असते.’’ प्रवासामध्ये प्रत्येक राज्यात त्या त्या वातावरणानुसार तेथील निसर्ग पहायला मिळतो. तेव्हा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू म्हणतात, ‘‘देवाचे मला पुष्कळ कौतुक वाटते. भगवंताने किती विचार करून ही सृष्टी बनवली आहे ! देव आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळे आणि फुले देतो.’’

२. प्रवासात वेगवेगळी झाडे दिसल्यावर त्या झाडांविषयी माहिती सांगून त्यांचे आयुर्वेदीय महत्त्वही सांगणे, तसेच फुलांचे रंग आणि गंध पाहून भगवंताकडे किती प्रकारचे गंध अन् रंग आहेत’, असे सांगतांना नेहमी भाव जागृत होणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

प्रवासात वेगवेगळी झाडे दिसल्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू त्या झाडांविषयी माहिती सांगतात. ‘त्या झाडांची पाने, फुले आणि फळे कधी येतात ? ती दिसायला आणि चवीला कशी असतात? त्यांचे आयुर्वेदीय महत्त्व काय आहे ?’, हे सर्व त्या सांगतात. रस्त्याच्या बाजूला गुलमोहराचे झाड नेहमी असते. त्या झाडाला लाल रंगाची पुष्कळ फुले लागलेली असतात. त्या फुलांचा रंग पाहून त्या म्हणतात, ‘‘देवाने किती सुंदर रंग बनवला आहे. या निसर्गात किती फळे आहेत ? त्यांची प्रत्येकाची चव वेगळी आहे. फुलांचे रंग आणि गंध किती वेगळे आहेत. ‘दोन फुलांचा गंध एकसारखा आहे’, असे कधी झाले नाही.’’ ‘त्या भगवंताकडे किती प्रकारचे गंध आणि रंग आहेत !’, असे सांगतांना त्यांचा भाव नेहमी जागृत होतो.

३. ‘मन डोंगराप्रमाणे स्थिर आणि नदीच्या पाण्याप्रमाणे निर्मळ अन् पारदर्शक असायला हवे’, असे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी सांगणे

डोंगराकडून नेहमी स्थिरता शिकायला हवी. कसलाही प्रसंग घडला, कितीही वारा आणि पाऊस आला, तरी डोंगर कधी त्याची जागा पालटत नाही. त्याप्रमाणे आपण नेहमी स्थिर असायला हवे. नदीचे पाणी किती निर्मळ आणि पारदर्शक असते ? त्या पाण्याप्रमाणे आपले मन नेहमी निर्मळ अन् पारदर्शक असायला पाहिजे. पाण्याकडे पाहून आपल्याला किती प्रसन्न वाटते ? तसे कुणीही आपल्याला पाहिल्यावर त्यांना तसे वाटायला हवे.

– श्री. वाल्मीक भुकन, चेन्नई. (१५.१२.२०२१)