उदारमतवादी आणि निधर्मीवादी अन् त्यांचे राजकीय पक्ष यांच्याकडून हिंदुद्वेषाचा एककलमी कार्यक्रम

तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा आणि काँग्रेसचे शशी थरूर यांनी कालीदेवीविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

‘तृणमूल काँग्रेस’च्या खासदार महुआ मोइत्रा यांनी ‘माझ्यासाठी कालीचा अर्थ मांस आणि मद्य ग्रहण करणारी देवी’, असे म्हणत पुन्हा एकदा हिंदु धर्माचा अवमान केला. यापूर्वीही त्यांनी ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण चालू असतांनाही हिंदु धर्म आणि शिवलिंग यांचा अवमान केला होता. ज्ञानवापीच्या वजुखान्यात शिवलिंग आढळल्यानंतर महुआ मोइत्रा यांनी ‘भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर’चे छायाचित्र ट्वीट करत ‘पुढचा क्रमांक याचा…’, असे म्हणत शिवलिंगाचा अवमान केला होता. मोइत्रा या हिंदु धर्म आणि हिंदु श्रद्धास्थाने यांचा अवमान करण्यासाठी सोकावलेल्या आहेत. त्या तृणमूल काँग्रेसचा भाग आहेत; कारण तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी स्वतः घोर हिंदुद्वेष्ट्या आहेत. ‘जय श्रीराम’ या जयघोषाला विरोध करण्यासाठी त्या थेट रस्त्यावर उतरून त्यांच्या समोर आलेल्या हिंदूंवर धावल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे ‘महुआ मोइत्रा यांनी कालीदेवीविषयी वादग्रस्त विधान करावे’ आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मध्ये न पडावे, असे होणार नाही, हे सिद्ध करत थरूर यांनी महुआ मोइत्रा यांचे समर्थन केले. ‘कालीविषयी महुआ मोइत्रा तेच बोलल्या, जे प्रत्येक हिंदु जाणतो’, असे थरूर म्हणाले.

हिंदू ईशनिंदेला विरोध करत नसल्यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्म आणि देवता यांचा अवमान केला जाणे

हिंदु अस्मितेचा अवमान करतांना महुआ मोइत्रा, शशी थरूर वा इतर कुणीही असो, ते नेहमी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आधार घेत असतात; पण त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य केवळ हिंदु धर्माचा अवमान करण्यासाठीच का बाहेर पडत असते ? कारण त्यांना माहिती आहे, ‘आपण हिंदु धर्माविषयी कितीही विचित्र विधाने केली, तरी कुणीही आपल्या घरावर दगडफेक करणार नाही वा घरात घुसून मारहाण करणार नाही वा आपला गळा कापणार नाही. हिंदू अधिकाधिक निषेधाचे दोन शब्द बोलतील वा एखादा मोर्चा काढतील. त्याहून अधिक काही करणार नाही’, याची त्यांना निश्चिती आहे. अर्थात् हिंदूंचा स्वभाव सहस्रो वर्षांपासून ‘जाऊ द्या, सोडून द्या, मला काय त्याचे’, या प्रकारचा वा क्षमा करण्याचा आहे. इतिहासातही अशी शेकडो उदाहरणे मिळतील, म्हणूनच भारतात म्हणजे हिंदूंमध्ये ईशनिंदेला विरोध करण्याचा प्रकार नाही.

उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी यांनी मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या समोर शरणागती पत्करणे

असे असले, तरी याचमुळे आज हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय सातत्याने चिरडले जात आहेत. महुआ मोइत्रा आणि शशी थरूर या दोघांनाही स्वतःला उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी दाखवायचे आहे. उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी यांचा ‘हिंदु धर्माचा अधिकाधिक द्वेष करणे’, हा निकष झाला आहे. यातूनच त्यांच्याकडून हिंदूंविषयी अपशब्द बोलण्याचा आणि हिंदूंचा अपमान करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला जातो; पण त्यांचा हा उदारमतवाद आणि धर्मनिरपेक्षतावाद मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या समोर शेपूट घालत असतो.

महुआ मोइत्रा आणि शशी थरूर यांनी केलेल्या वक्तव्यांना तृणमूल काँग्रेस अन् काँग्रेस यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी ‘हदीस’ वगैरेमध्ये लिहिलेलीच गोष्ट सांगितली, तर त्यावरून धर्मांध मुसलमानांकडून हैदोस घातला गेला; पण नूपुर शर्मांच्या आडून भाजप, रा.स्व. संघ यांना लक्ष्य करण्याचेही प्रकार केले गेले. आता मात्र महुआ मोइत्रा आणि शशी थरूर यांनी कालीदेवीविषयी केलेल्या विधानापासून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने अंतर राखले आहे. ‘दोन्ही नेत्यांनी व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही’, अशी भूमिका दोन्ही काँग्रेसने घेतली आहे. जर नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचा भाजप, रा.स्व. संघाशी संबंध असेल, तर महुआ मोइत्रा आणि शशी थरूर हे दोघे त्यांच्या पक्षापासून वेगळे कसे असतील ? शशी थरूर यांनी तर याआधी ‘हिंदु धर्माच्या तालिबानीकरणाचे’ यांसह आणखी कितीतरी वादग्रस्त विधाने केलेली आहेत. ती वैयक्तिक कशी असू शकतील ? यातून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांना मुसलमान अन् इस्लामी कट्टरपंथीय यांना संदेश द्यायचा असतो, ‘हिंदूंना जे काफिर समजतात, त्या काफिरांविषयी आमचेही मत तुमच्यासारखेच आहे.’ त्यामुळे ‘तुम्ही केवळ आमच्या पाठीशी उभे रहा’, असे केल्याने तुम्हालाही हिंदुद्वेषाचा पाढा चालू ठेवता येईल, असे सांगायचे असते; पण, याचा एक ना एक दिवस उलटा परिणाम झाल्याविना रहाणार नाही !

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)

संपादकीय भूमिका 

हिंदुद्वेष करणारे उदारमतवादी आणि निधर्मी हे मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या समोर मात्र ‘ब्र’ काढत नाहीत, हे जाणा !