राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शिवसेनेच्या खासदारांची मागणी

शिवसेना २ दिवसांत भूमिका घोषित करणार !

राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई – राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची मागणी केली.

(सौजन्य : ABP MAJHA) 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीविषयी भूमिका निश्‍चित करण्यासाठी ११ जुलै या दिवशी शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या खासदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यानंतर उद्धव ठाकरे २ दिवसांत शिवसेनेची भूमिका घोषित करणार आहेत. लोकसभेचे १९ आणि राज्यसभेचे ४ असे एकूण शिवसेनेचे २३ खासदार आहेत. त्यांपैकी केवळ गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, प्रताप जाधव आणि सदशिव लोखंडे हे ९ खासदार या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.