कुख्यात गुंड आबू सालेम याला २५ वर्षांच्या शिक्षेनंतर सोडावे लागेल ! – सर्वोच्च न्यायालय

पोर्तुगाल सरकारशी केलेल्या कराराची करून दिली आठवण !

डावीकडे कुख्यात गुंड आबू सालेम

नवी देहली – मुंबईमध्ये वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणात कुख्यात गुंड आबू सालेम याला दोषी ठरवण्यात आले आहे. पोर्तुगालने सालेम याला ११ नोव्हेंबर २००५ या दिवशी भारताच्या कह्यात दिले होते. त्याला वर्ष २०३० नंतर मुक्त करावे लागणार आहे. ‘पोर्तुगाल सरकारला दिलेल्या आश्‍वसनाप्रमाणे आबू सालेमला भारताच्या कह्यात दिल्यावर त्याने २५ वर्षांच्या कारागृहाची शिक्षा भोगल्यानंतर पोर्तुगालला दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी केंद्र सरकारला त्याला मुक्त करावे लागेल’, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले. ‘भारताने पोर्तुगालला दिलेल्या आश्‍वासनानुसार मला २५ अधिक वर्षांच्या कारागृहाची शिक्षा होऊ शकत नाही’, असा दावा सालेमने केला आहे.

न्यायालयाने सांगितले की, २५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारने भारताच्या राष्ट्रपतींचा सल्ला घेऊन कलम ७२ अंतर्गत भारतीय राज्यघटना आणि देशाप्रती असणार्‍या दायित्वांच्या अधिकारानुसार निर्णय घ्यावा. शिक्षेचा २५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मासाभराच्या आत संबंधित कागदपत्रे पुढे पाठवावीत. सरकार स्वत: भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत माफीच्या कायद्यानुसार २५ वर्षांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यासंदर्भातील कारवाई मासाभराच्या आत प्रारंभ करू शकते.