आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याच्या बांधकामाला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाकडून स्थगिती

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्‍वर येथे ५४ फूट उंच व्यासपिठावर उभारण्यात येणार्‍या आदि शंकराचार्य यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याच्या बांधकामाला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. निसर्गाची हानी आणि स्थानिक लोकांच्या श्रद्धेकडे दुर्लक्ष केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य न्यायमूर्ती रवि मलिमठ आणि न्यायमूर्ती विशाल मिश्रा यांच्या खंडपिठाने राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. मध्यप्रदेशातील भाजप शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ वननेस’ (एकतेचा पुतळा – आदि शंकराचार्य) याच्या बांधकामाला आव्हान देणार्‍या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा आदेश दिला. याचिकाकर्ता असलेल्या ‘लोकहित अभियान समिती’ या इंदूरस्थित स्वयंसेवी संघटनेने झाडे तोडण्यास आणि डोंगर खोदण्यास विरोध केला होता. या प्रकरणी न्यायालयाने खंडवा जिल्हाधिकारी, जिल्हा वन अधिकारी, महसूल अधिकारी आणि राज्य पुरातत्व विभाग यांच्याकडूनही उत्तर मागवले आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाने ओंकारेश्‍वर येथे २ सहस्र १४१ कोटी रुपये खर्चून आदि शंकराचार्य यांचा १०८ फूट उंच पुतळा, तसेच त्यांना समर्पित संग्रहालय आणि आंतरराष्ट्रीय अद्वैत वेदांत संस्था उभारण्याच्या प्रस्तावाला संमती दिली होती.