सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के

कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू

सोलापूर – सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये ९ जुलैच्या सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सोलापूर जिल्ह्याजवळ असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. त्या ठिकाणी ‘४.९ रिस्टर स्केल’ भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंप झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ‘कुठे हानी झाली आहे का ?’ याची चौकशी केली जात आहे.

सांगली जिल्ह्यातील जत पूर्व भागात भूकंपाचे ३० सेकंद धक्के जाणवले !

माडग्याळ (जिल्हा सांगली) – जत पूर्व भाग आणि कर्नाटक सीमावर्ती भाग येथे ९ जुलैच्या सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी भूकंपाचे ३० सेकंद धक्के जाणवले. सांगली जिल्ह्यातील माडग्याळ, सोन्याळ, बेळोंडगी, बोर्गी, करजगी, कोंतेवबोबलाद, संख, गिरगाव, मोरबगी आदी गावांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.