इलॉन मस्क यांच्याकडून ट्विटरच्या खरेदीचा करार रहित  

बनावट खात्यांची माहिती न दिल्याचे सांगितले कारण !

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि ‘टेस्ला’ आस्थापनाचे मालक इलॉन मस्क

नवी देहली – जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि ‘टेस्ला’ आस्थापनाचे मालक इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ हे सामाजिक माध्यम असलेले आस्थापन विकत घेण्यासाठीचा ४४ अब्ज डॉलर्सचा करार रहित केला. ट्विटर आस्थापन त्यांच्या माध्यमांतील खोट्या खात्यांची माहिती देण्यात अपयशी ठरले आहे, असे मस्क यांचे म्हणणे आहे. या करारातून माघार घेतल्यानंतर ट्विटर आता इलॉन मस्क यांच्यावर खटला प्रविष्ट करण्याच्या सिद्धतेत आहे.

एप्रिलमध्ये इलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यामध्ये ५४.२० डॉलर प्रति शेअर दराने अनुमाने ४४ अब्ज डॉलरचा करार झाला होता; मात्र त्यानंतर मे मासामध्ये मस्क यांनी हा करार थांबवला होता. मस्क म्हणाले होते, ‘ट्विटरने प्रथम हे सिद्ध केले पाहिजे की,  त्याच्या माध्यमांवरील बनावट खाती ५ टक्क्यांपेक्षा अल्प आहेत.’ काही दिवसांपूर्वी ट्विटरने सांगितले की, यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत सक्रीय वापरकर्त्यांमधील बनावट खात्यांची संख्या ५ टक्क्यांपेक्षा अल्प होती.