कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्याची मागणी

मुंबई, ८ जुलै – कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाचे विशेष पोलीस पथकाकडे (‘एस्.आय.टी.’कडे) असलेले अन्वेषण आतंकवादविरोधी विभागाकडे (‘एटीएस्’कडे) वर्ग करण्याची मागणी कॉ. पानसरे यांच्या नातेवाइकांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. यावर न्यायालयाने २१ जुलैपर्यंत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे हे गेली साडेचार वर्षे या प्रकरणाचे अन्वेषण अधिकारी म्हणून काम पहात आहेत. ‘या पदावरील अधिकारी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी कर्तव्य बजावू शकत नाही’, असे कायद्यात नमूद करण्यात आले आहे; मात्र ‘न्यायालयाच्या अनुमतीवना अन्वेषण अधिकारी पालटू नये’, असे आदेश आहेत. त्यामुळे काकडे यांच्या स्थानांतरासाठी सरकारकडून न्यायालयाकडे मागणी करण्यात आली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. काकडे यांची नियुक्ती करण्यापूर्वी नव्या अधिकार्‍याची नियुक्ती करावी, असे न्यायालयाने सूचित केले आहे.