भगवान शिव आणि पार्वती यांच्या वेशभूषेतील पुरुष ओढत आहेत सिगरेट !

‘काली’ भित्तीपत्रकानंतर आता धर्मद्रोही लीना मणीमेकलाई यांच्याकडून आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित !

‘काली’ माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणीमेकलई

नवी देहली – ‘काली’ माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणीमेकलई यांनी त्यांच्या आक्षेपार्ह भित्तीपत्रकावरून क्षमा मागण्यास नकार दिला असतांनाच आता त्यांनी एक नवीन छायाचित्र प्रसारित केले आहे. यातून आता भगवान शिव आणि पार्वतीदेवी यांचा अवमान करण्यात आला आहे. या छायाचित्रामध्ये भगवान शिव आणि पार्वतीदेवी यांची वेशभूषा केलेले पुरुष धूम्रपान करतांना दाखवले आहेत. ‘इतरत्र’ असे याला शीर्षक देण्यात आले आहे. या छायाचित्रावरून सामाजिक माध्यमांतून लीना यांच्यावर टीका होत आहे.

(म्हणे) ‘भारत कधी हिंदु राष्ट्र बनू शकत नाही ! – लीना मणीमेकलई

लीना मणीमेलई यांनी या छायाचित्रावर पुढे ट्वीट करून म्हटले आहे, ‘भाजपच्या ‘पेरोल ट्रोल आर्मी’ला (पैसे देऊन सामाजिक माध्यमांतून विरोध करणार्‍या सैन्याला) ठाऊक नाही की, नाटकात काम करणारे कलाकार त्यांच्या कामानंतर किती शांत रहातात. हे चित्र माझ्या चित्रपटातील नाही. हे ग्रामीण भारतातील छायाचित्र आहे. ज्याला संघ परिवार भारतातून त्याच्या अथक द्वेषातून आणि धार्मिक कट्टरतेद्वारे नष्ट करू पहात आहे. भारत कधीही हिंदु राष्ट्र बनू शकत नाही.’

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

हिंदु धर्माचा अपमान करणे, म्हणजेच उदारमतवाद आहे का ? – भाजप

या छायाचित्राविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, हा सर्जनशील अभिव्यक्तीचा विषय नाही, तर ही जाणीवपूर्वक चिथावणी आहे. हिंदूंना शिव्या देणे, म्हणजेच धर्मनिरपेक्षता आहे का ? हिंदु धर्माचा अपमान करणे, म्हणजेच उदारमतवाद आहे का ?, साम्यवादी पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस हे लीना यांना पाठिंबा देत आहेत; म्हणून तिला अशी चित्रे प्रसारित करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.

कोण आहेत लीना मणीमेकलई?

लीना मणीमेकलई यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील मदुराई येथील महाराजापूरम् या गावात जन्म झाला.  त्यांच्या गावात अशी प्रथा होती की, एखादी मुलगी वयात आल्यानंतर काही वर्षांमध्येच तिचे लग्न तिच्या मामासमवेत लावून द्यायचे. लीना यांचेही लग्न तिच्या मामासमवेत ठरले होते; मात्र लग्नाची सिद्धता चालू असतांनाच त्या घर सोडून चेन्नईला पळून गेल्या. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी,तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रांसह अनेक ठिकाणी नोकर्‍या केल्या आणि नंतर चित्रपटसृष्टीत आल्या. देवदासी प्रथेवर त्यांनी बनवलेल्या ‘माथम्मा’ या माहितीपटावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. दलित महिलांवर होणार्‍या हिंसेविषयी बनवलेला ‘पराई’ आणि धनुषकोडीमधील मासेमारांवर बनवलेला ‘सेंगदाल’ या माहितीपटांवरूनही वाद झाले होते.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे जाणीवपूर्वक हिंदूंच्या देवतांचा अवमान करून भारतात असंतोष निर्माण करण्यामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे का ? याचा शोध भारत सरकारने घेतला पाहिजे !