श्रीलंकेतील ६० लाख लोकांना भेडसावत आहे अन्न असुरक्षितता !

ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेला विक्रेता

नवी देहली – संयुक्त राष्ट्रांच्या ‘जागतिक खाद्य कार्यक्रम’ या शाखेच्या नवीन अन्न असुरक्षिततेच्या मूल्यांकनानुसार श्रीलंकेतील १० पैकी ३ कुटुंबांना ‘आमच्या पुढील भोजनाची व्यवस्था  कुठून केली जाईल’, याविषयी अनिश्‍चित असतात. सुमारे ६० लाख नागरिकांना भोजनाची व्यवस्था करणे कठीण जात आहे. त्यांना अन्न असुरक्षितता भेडसावत आहे, असे ‘जागतिक खाद्य कार्यक्रम’ शाखेचे म्हणणे आहे. ‘श्रीलंकेतील पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे गर्भवती महिलांवर गंभीर परिणाम होतील’, अशी चेतावणीही जागतिक खाद्य कार्यक्रमाने दिली आहे.

१. श्रीलंकेतील सुमारे ६१ टक्के कुटुंबे रहाणीमानावर अल्प खर्च करण्याची सिद्धता करत आहेत. तेथील अनेक कुटुंबे अन्नग्रहण करण्याचे प्रमाण अल्प करत आहेत. त्याचसमवेत अनेक जण पौष्टिक आहार घेण्याचे टाळतांना दिसतात.

२. संयुक्त राष्ट्रांच्या ‘जागतिक खाद्य कार्यक्रम’ शाखेच्या अंदाजानुसार श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या कालावधीत अन्न तुटवड्याचा सामना करणार्‍या नागरिकांच्या सूचीत आणखी लोकांची भर पडण्याची शक्यता आहे.

३. श्रीलंकेकडे सध्या ना तेल शेष आहे ना तेल विकत घेण्यासाठी पैसा आहे. श्रीलंकेवर प्रचंड परदेशी कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे तेल पुरवठादार देश त्याला तेल देण्यास नकार देत आहेत.

४. ‘देशात सध्या जो तेलाचा साठा शेष आहे, त्यामधून आरोग्य, सार्वजनिक वाहतूक आणि अन्न वितरण यांसारखी महत्त्वाची कामे काही दिवस चालवता येतील’, असे एका अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.