नृत्यकलेकडे ‘साधना आणि ईश्वरप्राप्ती’ करण्याचा मार्ग म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

नृत्यसाधना

१. नृत्यसाधना

‘नृत्यकलेच्या माध्यमातून देवाच्या चरणी समर्पित होऊन सूक्ष्म रूपातील भगवंताच्या चरणांचा स्पर्श अनुभवणे म्हणजे नृत्यसाधना !

२. परात्पर गुरुदेवांमुळे साधकांना ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ हा नवीन दृष्टीकोन मिळणे

नृत्यसाधनेची अनुभूती घेण्यासाठी या कलियुगात आपल्यावर केवळ आणि केवळ ‘गुरुकृपा’ असणे आवश्यक आहे. आपण सर्व साधक पुष्कळ भाग्यवान आहोत; कारण साक्षात् महाविष्णुच आपल्याला ‘गुरु’रूपात लाभला आहे. साधकांना ईश्वरप्राप्ती करता यावी, यासाठी गुरुदेवांनी संगीत, नृत्य या योगांची निर्मिती केली आहे. विष्णुस्वरूप गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) एका स्मितहास्याने अवघ्या सृष्टीचे कल्याण होते, तर आम्हा साधकांना नृत्याच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करून देणारेसुद्धा तेच महान गुरु आहेत. केवळ त्यांच्यामुळेच आम्हाला ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ असा आगळावेगळा दृष्टीकोन मिळाला आहे. साधकांना साधना करता यावी, यासाठी त्यांनीच आपल्याला त्या कला दिल्या आहेत.

३. कलियुगात मानवाची सात्त्विकता अल्प झाल्यामुळे भावपूर्ण नृत्य होण्यासाठी भगवंताला शरण जाणे आवश्यक

कलियुगात मानवाची सात्त्विकता अतिशय अल्प झाली आहे. त्यामुळे ‘आपण नृत्य केले आणि भगवंत प्रसन्न होऊन आपल्यासमोर आला’, असे होऊ शकत नाही. आपल्यामध्ये तेवढे सामर्थ्य नाही; परंतु भगवंत सामर्थ्यवान आहे. त्यामुळे आपण आपली असमर्थता त्याच्या चरणी समर्पित केली, तर नृत्यातून देवाला अनुभवण्यास तो आपल्याला समर्थ बनवू शकतो.

४. कलेद्वारे ईश्वरप्राप्ती करतांना सर्वप्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून गुणसंवर्धन प्रक्रियेला महत्त्व देणे आवश्यक असणे

कु. अपाला औंधकर

आपल्यातील स्वभावदोष आणि अहं मुळापासून नष्ट होण्यास अनेक जन्म लागतात; परंतु आपल्यावर गुरुकृपा असल्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् गुणसंवर्धन ही प्रक्रिया आपल्याला गुरूंनीच शिकवली आहे. कलेद्वारे ईश्वरप्राप्ती करायची असेल, तर ही प्रक्रियाच आपली पहिली गुरु आहे. जोपर्यंत आपल्यात स्वभावदोष आणि अहं आहेत, तोपर्यंत आपण भगवंतापासून दूर रहातो. आपण भगवंतापासून दूर असू, तर नृत्याच्या माध्यमातून त्याच्याजवळ कसे जाऊ ? त्यामुळे आपल्याला सर्वांत आधी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून स्वतःमध्ये गुणांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेच्या अंतर्गत नियमित सारणी लिखाण करणे, स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी स्वयंसूचनांची सत्रे करणे आणि भाववृद्धी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यानंतर ‘आपण ते प्रयत्न किती सातत्याने आणि प्रामाणिकपणे करतो’, हेही पहायला हवे. आपले प्रयत्न सातत्याने झाले, तर आपोआपच आपली अंतर्मुखता वाढते.

५. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांविना आणि व्यष्टी प्रयत्नांसह नृत्य यांमधील भेद शिकायला मिळणे

मी वर्ष २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये शालेय सट्टीच्या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात यायचे. त्या वेळी मी नृत्य शिकायचे. तेव्हा माझ्या मनात केवळ ‘मी नृत्य करते’, हा एकच विचार असायचा. त्यात भाव किंवा अंतर्मुखता नव्हती. दळणवळण बंदीच्या कालावधीत माझ्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांची घडी चांगली बसल्याने गुरुकृपेने माझ्यातील अंतर्मुखता वाढली आणि माझी प्रतिदिन भावजागृती होऊ लागली. त्यामुळे आधीच्या तुलनेत नृत्य भावपूर्ण आणि गुरुदेवांना स्मरून होऊ लागले.

६. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी नृत्यातील मुद्रांचा अभ्यास करण्यास सांगणे

वर्ष २०२० मध्ये कु. तेजल पात्रीकर यांनी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) माझ्यासह नृत्याचा अभ्यास करणार्‍या अन्य साधिकांना ‘मुद्राभ्यास’ (हातांनी केलेल्या नृत्यातील वेगवेगळ्या अर्थपूर्ण हालचालींचा अभ्यास करणे) करण्यास सांगितले. हा अभ्यास करतांना ‘मुद्रेचा कोणत्या कुंडलिनीचक्रावर परिणाम होतो ? त्या वेळी मनाला काय जाणवते ? आणि कोणत्या देवतेचे स्मरण होते ?’, यांचे चिंतन करण्यास सांगितले.

७. ‘नृत्याभ्यासापूर्वी भावप्रयोग किंवा शरणागतभावाने प्रार्थना करणे

हा अभ्यास करायला आरंभ केल्यावर मला लगेच अनुभूती आल्या नाहीत. त्यामुळे मी पुन्हा तेजलताईंना विचारले, ‘‘आता मी काय करू ?’’ त्या वेळी त्यांनी मला सांगितले, ‘‘एक भाववृद्धीसाठी प्रयोग कर आणि मग अभ्यासाला आरंभ कर.’’ मी तसा प्रयत्न करणे चालू केल्यावर माझ्या लक्षात आले की, ‘नृत्याभ्यासापूर्वी भावप्रयोग जितका भावपूर्ण करतो किंवा शरणागतभावाने प्रार्थना करतो, तेवढा मुद्राभ्यास किंवा नृत्यसराव परिणामकारक आणि भावपूर्ण होतो.’ अजूनही मी भावप्रयोग केल्याविना एकही मुद्राभ्यास करत नाही; कारण त्याविना मला काही अनुभवताच येत नाही. यातून मला ‘नृत्यात केवळ हालचाली किंवा मुद्रा यांनाच नाही, तर ईश्वराप्रतीच्या भावालाही महत्त्व आहे ?’, हे शिकायला मिळाले.

८. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे मुद्राभ्यास करतांना शिवाशी संबंधित अनुभूती येणे

व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले झाल्यामुळे मला प्रतिदिन नृत्यमुद्राभ्यास करतांना विविध अनुभूती येतात. एकदा मी मुद्राभ्यास करत होते. त्या वेळी मला ‘साक्षात् भगवान शंकर नृत्य करत असल्याचे दिसले. ते भरतनाट्यम् नृत्य नव्हते आणि कथ्थकही नव्हते. ते त्या दोन्ही नृत्यांपेक्षा निराळे असे सात्त्विक नृत्य होते. ते नृत्य पहातांना माझे ध्यान लागले आणि मला आतून पुष्कळ थंडावा जाणवत होता. त्यानंतर ‘शिवाच्या जटेमधील गंगा वहात आहे’, असे मला दिसले. त्या वेळी माझी भावजागृती झाली. ‘शिवाच्या सात्त्विक नृत्यामुळे पूर्ण ब्रह्मांड भावविभोर झाले आहे’, असे मला जाणवले. गुरुदेवांच्या कृपेमुळेच आलेल्या या अनुभूतीविषयी माझ्याकडून पुष्कळ वेळा कृतज्ञता व्यक्त होत होती.

९. ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या पाच टप्प्यांतून नृत्यकला सादर करून आपण शांतीच्या (सर्वाेत्तम) टप्प्याला कसे पोचू शकतो ?’, हे लक्षात येणे  

अ. नृत्यकलेद्वारे भगवंताकडे पोचण्याचा अजूनही एक मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे, ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’ अशा पाच टप्प्यांत नृत्याचा सराव करून ईश्वराच्या सर्वश्रेष्ठ अशा शांती (निर्गुण) रूपाशी एकरूप होणे.’

आ. आपल्यात स्वभावदोष आणि अहं आहेत, तोपर्यंत आपण ‘शक्ती’च्या स्तरावर असतो. त्यामुळे आपण देवापासून दूर असतो. आपण व्यष्टी साधनेचे प्रयत्न आणि साधना सातत्याने केल्यावर आपल्यामध्ये आपोआपच भाव जागृत होतो. भावजागृती झाल्याने आपल्याला प्रत्येक क्षणी गुरुदेवांना अनुभवता येते आणि त्या वेळी आपले नृत्य भावाच्या स्थितीत होते. यानंतर तो भाव गुरुचरणी अर्पण केल्यावर गुरुच आपल्याभोवती चैतन्याचे कवच निर्माण करतात आणि त्यानंतर आपली कला चैतन्याच्या स्तरावर होऊ लागते. चैतन्यात एवढे सामर्थ्य आहे की, त्यामुळे आपल्यातील रज-तमयुक्त स्वभावदोष-अहं आपोआप नष्ट होऊ लागतात.

इ. नृत्य चैतन्याच्या स्तरावर झाल्याने आपल्याला त्यातून आनंद मिळू लागतो. एकदा आनंद मिळाल्यावर ‘आपण तो आनंद सतत अनुभवावा’, असे आपल्याला वाटते. या तळमळीमुळे आपले नृत्य आनंदाच्या स्तरावर होते. त्यानंतर गुरुच आपल्याला सर्वांत उच्च स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकतात. आपले ‘साधनेतील प्रयत्न वाढल्याने, सतत भावस्थितीत राहिल्याने आणि कर्तेपणा ईश्वरचरणी अर्पण केल्याने आपोआपच आपल्याला ‘नृत्य न करता, केवळ त्यातील शांती अनुभवावी’, असे वाटते.

१०. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘हे परात्पर गुरुदेवा, ‘या घनघोर कलियुगात भगवंताविना अन्य कोणीही आम्हाला कलेद्वारे साधना शिकवू शकत नाही. केवळ आणि केवळ आपणच आम्हाला आमचा हात धरून या मार्गावरून पुढे नेत आहात. गुरुदेवा, आपल्यापुढे ‘शरणागती आणि कृतज्ञता’ हे शब्द पुष्कळ छोटे आहेत. ‘भगवंता, आमच्यासारख्या छोट्या जिवांचा साधनेत कलेद्वारे उद्धार होण्यासाठीच तुम्ही मार्गदर्शन करत आहात’, याची आम्हाला सतत जाणीव असू दे. ‘गुरुदेवा, आम्हाला कितीही अनुभूती आल्या किंवा आम्ही प्रयत्न केले, तरी ते आमचे नसून आपणच आम्हाला सर्वकाही दिले आहे. गुरुचरणी समर्पित राहून आपणच आमच्याकडून ही सेवा करवून घ्या आणि आमच्या मनात ही जाणीव सतत असू दे’, अशीच आर्तभावाने प्रार्थना करते आणि हा लेख तुमच्या सुकोमल चरणी कृतज्ञतापुष्पाच्या रूपात अर्पण करते.’

– परात्पर गुरुदेवांची, कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (११.११.२०२१)

(एवढ्या लहान वयात कलेतून ईश्वरप्राप्तीचे टप्पे सहजपणे लक्षात येऊन ते आचरणात आणणारी कु. अपाला ही नृत्यातून साधना करण्यास इच्छुक असणार्‍यांसाठी एक आदर्श आहे. तिचा लेख वाचून तिच्यातील साधनेची प्रगल्भताच यातून दिसून येते. ती दैवी बालिका आहे, हेही यातून स्पष्ट होते. – कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक