नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ केल्याचे प्रकरण
नागपूर – नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ केल्यामुळे येथील एका कुटुंबाला महाराष्ट्र राज्यातून पळून जावे लागले. सतत धमक्या येत असल्याची तक्रारही पीडित तरुणाने नंदनवन पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्याचे समजते.
१. २२ वर्षीय तरुणाने १४ जून या दिवशी ‘इन्स्टाग्राम’वर नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ प्रसारित केली. मध्यरात्री १ वाजल्यापासून त्याला सतत धमकीचे भ्रमणभाष आणि लघुसंदेश येऊ लागले. भयभीत झालेल्या तरुणाने पहाटे ४ वाजता नंदनवन पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.
२. २ दिवसांनी १०० जणांचा जमाव त्याच्या घरावर चाल करून आला; परंतु तरुणाच्या कुटुंबियांना या घटनेविषयी आधीच लक्षात आल्याने ते सर्वजण एका हॉटेलमध्ये जाऊन लपले. तेथे २ दिवस राहून त्यांनी नागपूर सोडले.
३. धमक्या मिळणे थांबतच नसल्याने त्यांनी महाराष्ट्र सोडून अज्ञात ठिकाणी वास्तव्य केले आहे, असे समजते.
४. पोस्ट करणार्या तरुणाचा मोठा भाऊ नागपूर येथे व्यवसाय करतो; पण त्याला तेथे लपूनछपून वावरावे लागत आहे. त्याने सांगितले, ‘‘कुठल्याही धर्माचा अपमान करणे, हा आमचा हेतू नव्हता. माझा लहान भाऊ तरुण असून त्याने चुकून ‘पोस्ट’ ‘फॉरवर्ड’ केली होती. आम्ही त्याला ती ‘पोस्ट’ काढून टाकायला लावली, तसेच दुसरी ‘पोस्ट’ करून क्षमायाचनाही करण्यास सांगितली; पण तरीही धमक्या दिल्या जात आहेत.
५. उदयपूर आणि अमरावती येथील घटनांमुळे आमचे कुटुंब घाबरलेले असून अज्ञातस्थळी रहात आहेत. पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप पीडित तरुणाच्या भावाने केला आहे.
(संदर्भ : ‘दिव्य मराठी’ वृत्तसंकेतस्थळ)