नामजप आणि प्रार्थना करतांना अंतरीचा भाव जागृत होण्यास साहाय्य करणारे भावप्रयोग !

नामजप आणि प्रार्थना भावपूर्ण झाल्यास देवाला अनुभवता येते. त्यामुळे प्रार्थना करतांना इष्टदेवतेचे रूप डोळ्यांसमोर आणून डोळे मिटून ते रूप आठवत चरणांवर दृष्टी स्थिर ठेवल्यास अंतरीचा भाव जागृत होण्यास साहाय्य होते. यासाठी करावयाचे काही भावप्रयोग पुढे दिले आहेत.

१. आपण सर्व जण देवाच्या चरणांजवळ बसून नामजप करत आहोत. आपण हाताच्या ओंजळीत ताजी टवटवीत सुगंधी फुले आणि तुळशीपत्रे घेऊन भगवंताच्या चरणांवर अर्पण करत आहोत. ‘एक फूल वहाणे, म्हणजे एक नाम घेणे’, या शरणागतभावाने लीन होऊन नामजप करूया. फुले देवाच्या चरणांवर अर्पण झाल्याने त्या फुलांना आनंद होत आहे. ‘ती स्पंदने आपल्याला अनुभवता येऊ देत’, अशी प्रार्थना करूया. एका दिवसाचे आयुष्य असलेली फुले देवाच्या चरणी अर्पण झाली आणि त्यांचे जीवन सार्थकी लागून त्यांनी त्यांचा उद्धार करवून घेतला; कारण त्यांच्यात कोमलता, मनमोहकता आणि सुंदरता असा समर्पणाचा भाव आहे. या त्यांच्या गुणांमुळे त्यांनी आनंदप्राप्ती, म्हणजेच ईश्वरप्राप्ती करवून घेतली आहे.

२. ‘हे भगवंता, मलाही फुलांप्रमाणे तुझ्या चरणांजवळ घे. फुलांत अल्प अहं आहे आणि त्यांच्यात तुझ्या भेटीची आस अधिक आहे. देवा, माझी तशी तळमळ नाही किंवा तसे गुणही नाहीत. देवा, तुला मी कशी भेटू ? मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहं तुझ्यापासून दूर नेत आहेत. मला तुझ्या चरणांशी घे’, असा देवाच्या समवेत संवाद साधतांना फुले आनंदी झाली आणि मलाही आनंद दिला. तेव्हा माझ्यावर उपाय झाले आणि नामजप अंतर्मनातून करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होऊ लागला. माझा वैखरीतून होणारा नामजप आता भावपूर्ण होऊ लागला. माझ्या मनातील विचारांचे प्रमाण न्यून झाले. माझ्या डोळ्यांसमोर मला देवतेचे रूप आणि चरण दिसल्यामुळे ‘प्रत्यक्ष देव (गुरु) उभा आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न केल्याने नामजप अधिकाधिक गुणात्मक आणि भावपूर्ण होऊ लागला.

३. मी वातावरणात (हवेत) नामजप लिहीत आहे. माझे लक्ष नामाकडे असल्यामुळे त्यातील सर्व अडथळे दूर होत आहेत. आता मी नामजप प्रत्येक अवयव आणि पेशी यांवर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मन नामात व्यस्त आहे. आरंभी नामजप वरवरचा होत होता. आता अंतर्मुखतेने होत आहे. नामातील अंतर्मुखता वाढल्याने आजूबाजूचा आवाज किंवा हालचाली यांकडे लक्ष जात नाही. त्यामुळे चांगले वाटत आहे. नामजपामुळे मिळालेली ऊर्जा आणि शक्ती माझ्यावरील आवरण काढण्यास साहाय्य करत आहेत.

‘हे भगवंता, माझ्याकडून असे प्रयत्न होत नाहीत. तू मला ही सूत्रे सुचवली आहेस. देवा, माझ्या माध्यमातून तूच लिहून घेतले आहेस. मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– एक साधिका, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.१.२०१८)