किरकटवाडी (जिल्हा पुणे) – सिंहगडावर जाण्यास सायंकाळनंतर पर्यटकांना मनाई आहे. असे असतांना अवसरवाडी, तसेच डोणजे गोळेवाडी मार्गे घाटरस्त्याने रात्री-अपरात्री गडावर जाऊन प्रेमीयुगुले अक्षरशः धुडगूस घालत आहेत. चारचाकी तसेच दुचाकी यांवरून येणारे प्रेमीयुगुल घाटरस्त्याच्या लगत असलेल्या घनदाट जंगलात, तसेच धोकादायक कड्याच्या कठड्यावर बसून मौजमजा करत आहेत. गडावरील वाहनतळापासून पुणे दरवाजापर्यंत अनेक जण रात्रीच्या अंधारात भटकंती करत आहेत. भ्रमणभाषवर ‘सेल्फी’ काढण्यापासून बुरुजावर बसून मौजमजा करण्यात मग्न असलेले दिसत आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सिंहगडसारख्या पवित्र ठिकाणी असे प्रकार घडत असतांना संबंधित प्रशासन मात्र याविषयी अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. अशा वेळी घाटरस्त्यावर अथवा गडावरील गाडीतळावर एखादी अनुचित घटना घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? असा प्रश्न शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
‘राजे शिवराय प्रतिष्ठान’चे अध्यक्ष महेश पवळे यांनी सांगितले की, गडाचे पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? – संपादक) जोपर्यंत पैसे मिळतात, तोपर्यंत दिवसभर ‘चेकपोस्ट’ चालू असतो, रात्रीच्या वेळी मात्र एकही कर्मचारी नसतो. अधिकार्यांनी लवकरात लवकर रात्रीचे सुरक्षा कर्मचारी न नेमल्यास आम्ही याविषयी तीव्र आंदोलन करणार आहोत.
सिंहगड वन विभागाचे अधिकारी बाबासाहेब लटके यांनी सांगितले की, सिंहगडाच्या दोन्ही तपासणी नाक्यांवर रात्री १० वाजेपर्यंत सुरक्षारक्षक थांबतात; मात्र रात्री-अपरात्री काही अतीउत्साही पर्यटक जात असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाच्या वतीने तातडीने आवश्यक ती काळजी घेतली जाणार आहे. अतीउत्साही प्रेमीयुगुले, पर्यटक यांना प्रतिबंध करण्यासाठी रात्रीपासून सकाळपर्यंत सशस्त्र माजी सैनिक पथकर नाक्यावर तैनात करण्याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिका
|