नागरिकांसह ‘दक्ष कराडकर ग्रुप’ची मागणी
सातारा, २९ जून (वार्ता.) – कराड शहरातील वाखाण परिसरात कु. राजवीर ओव्हाळ (वय अडीच वर्षे) याचा भटक्या कुत्र्यांनी केलेल्या आक्रमणात मृत्यू झाला होता. या प्रकरणी शहरातील जागृती नागरिक आणि ‘दक्ष कराडकर ग्रुप’च्या वतीने पालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ‘भटक्या कुत्र्यांना पकडावे आणि कु. राजवीर याच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. कु. राजवीर याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याला उत्तरदायी कोण ? भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत; मात्र पालिकेकडून जुजबी उपाययोजना केल्या जातात. ठोस उपाययोजना करून कायमचा प्रतिबंध केला जात नाही.
२. शहरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने कायमस्वरूपी प्रतिबंध (बंदोबस्त) करण्यात यावा. अन्यथा इथून पुढे शहरात भटक्या कुत्र्यांचे आक्रमण झाल्यास पालिका प्रशासनास दोषी धरून संबंधितांवर न्यायालयात गुन्हे नोंद करण्यात येतील. त्यामुळे या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून तत्परतेने योग्य ती कार्यवाही करावी.