आज महाराष्ट्र सरकारची परीक्षा : बहुमत सिद्ध करावे लागणार !

विशेष अधिवेशन घेण्याचे राज्यपालांचे निर्देश !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई – महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २८ जून या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर २९ जून या दिवशी सकाळी राज्यपालांनी राज्याच्या विधानसभेच्या सचिवांना ३० जून या दिवशी विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील विश्‍वासदर्शक ठराव आणि राज्य सरकारने बहुमत सिद्ध करणे, या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. या निर्देशाच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली आहे.

राज्यपालांनी सरकारला पाठवलेल्या पत्रातील निर्देश असे…

१. सभागृहाच्या सचिवांनी सभागृहाचे कामकाज योग्य पद्धतीने पार पडेल, याची काळजी घ्यावी. ३० जूनला होणार्‍या विशेष अधिवेशनाच्या नियोजनाची सिद्धता सचिवांनी करावी. ३० जूनला सायंकाळी पाच ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी पूर्ण झाली पाहिजे.

२. विधानभवनाच्या आत-बाहेर पुरेशी सुरक्षा तैनात करण्यात यावी. मतदानाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा ठेवली जावी.

३. या विश्‍वासदर्शक ठरावाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे. त्यासंदर्भातील सर्व नियोजनही केले जावे.

४. मतदान हे योग्य आणि मुक्त पद्धतीने व्हावे, यासाठी सदस्यांनी उभे राहून स्वतःचे मत नोंदवावे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या नियमांनुसार हे निर्देश दिले जात आहेत.

५. काहीही झाले, तरी हा ठराव आणि बहुमत चाचणी ३० जूनलाच पूर्ण केली जावी. कोणत्याही कारणाने ती पुढे ढकलली जाऊ नये.

६. या संपूर्ण मतदान प्रक्रियेचे ध्वनीचित्रीकरण करण्यात यावे, याचे दायित्व सचिवांवर असेल. त्यांनी ही ध्वनीचित्र-चकती माझ्याकडे सुपूर्द करावी.