दोषींना तात्काळ ठार केले पाहिजे !

  • राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांची मागणी

  • कन्हैय्यालाल यांच्या हत्येचे प्रकरण

मंत्री प्रताप सिंह खाचरियावास

जयपूर (राजस्थान) –  कन्हैय्यालाल यांच्या हत्येमुळे मी संतप्त झालो आहे. दोषींना ठार केले पाहिजे. त्यांना ४ दिवसांत फासावर लटकवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी व्यक्त केली. ते २८ जून या दिवशी येथे कन्हैय्यालाल यांची रियाज अन्सारी आणि महंमद गौस या दोघा जिहाद्यांनी शिरच्छेद करून हत्या केल्याच्या घटनेवर बोलत होते. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी कन्हैय्यालाल यांच्या ८ वर्षांच्या मुलाने सामाजिक माध्यमांवर नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट प्रसारित केली होती. त्यावरून पोलिसांनी कन्हैय्यालाल यांना अटक केली होती. तरीही जिहादी त्यांना ठार मारण्याची धमकी देत होते. यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार करून संरक्षण देण्याची मागणी केली होती. (जर कन्हैय्यालाल यांनी संरक्षणाची मागणी केली होती, तर पोलिसांनी ती का दिली नाही ?  संबंधित पोलिसांची राजस्थानचे काँग्रेस सरकार चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार का ? – संपादक) धमकीमुळे त्यांनी त्यांचे शिवणकामाचे दुकानही बंद ठेवले होते. कन्हैयालाल यांनी १० दिवसांनी, म्हणजे २८ जून या दिवशी दुकान उघडल्यावर त्यांची हत्या करण्यात आली.

आरोपींना फाशी द्या ! – कन्हैय्यालाल यांच्या पत्नीची मागणी

आरोपींना फाशी दिली पाहिजे, अशी मागणी कन्हैय्यालाल यांच्या पत्नीने मागणी केली. आज त्यांनी माझ्या पतीला मारले, उद्या ते दुसर्‍या कुणाला तरी मारतील, असेही त्या म्हणाल्या.

कट्टरतावाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विभाग स्थापन करा ! – असदुद्दीन आवैसी

प्रत्येक हिंसेचा निषेध केला पाहिजे. कुणालाही कायदा हातात घेण्याचा आणि त्याचे समर्थन करण्याचा अधिकार नाही. कट्टरतावादावर नियंत्रण मिळवण्याची आवश्यकता आहे. अशा कट्टरतावाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व धर्मांसाठी एक विभाग असला पाहिजे. केवळ एका धर्मासाठी नको, अशी प्रतिक्रिया एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन आवैसी यांनी व्यक्त केली.

दहशत पसरवणार्‍यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे ! – राहुल गांधी

उदयपूरमध्ये जी निर्घृण हत्या झाली, त्यामुळे मला धक्का बसला आहे. धर्माच्या नावावर चालू असलेली क्रूरता खपवून घेतली जाणार नाही. दहशत पसरवणार्‍यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. आपल्या सर्वांना समवेत येऊन द्वेषाचा पराभव करायचा आहे. सर्वांनी शांतता आणि बंधुभाव राखावा, असे माझे आवाहन आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचे आवाहन न करता कायदेशीररित्या तात्काळ कारवाई व्हावी, असेच जनतेला वाटते !