कन्हैयालाल यांच्या हत्येमागे पाकिस्तानमधील जिहादी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’चा हात !

नवी देहली – कन्हैयालाल यांच्या हत्येमागे पाकिस्तानमधील ‘दावत-ए-इस्लामी’ ही सुन्नी मुसलमानांची जिहादी संघटना असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेले रियाज अन्सारी आणि महंमद गौस या संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना जगातील १०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. इस्लामच्या प्रचार आणि प्रसार यांसाठी ही संघटना ऑनलाईन अभ्यासक्रमही घेते. या संघटनेवर भारतात धर्मांतर करण्याचा आरोप आहे.

१. दावत-ए-इस्लामी संघटना स्वतःला ‘बिगर राजकीय संघटना’ म्हणून सांगते. तिची स्थापना मौलाना (इस्लामचे अभ्यासक) अबू बिलाल महंमद इलियास यांनी वर्ष १९८१ मध्ये पाकच्या कराची शहरात केली. गेल्या ४० वर्षांपासून ही संघटना भारतातही कार्यरत आहे. शरियत कायद्याचा प्रचार-प्रसार आणि शिक्षण देण्याचा या संघटनेचा उद्देश आहे.

२. या संघटनेचे स्वतःचे संकेतस्थळ आहे. याद्वारे इस्लामी शिक्षण दिले जाते. या संकेतस्थळावर इस्लामच्या प्रसारचे ३२ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. महिला आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आहेत.

धर्मांतरित झालेल्या मुसलमानांना जिहादी बनवण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण

दावत-ए-इस्लामी संघटनेच्या संकेतस्थळावर ‘न्यू मुस्लिम कोर्स’ हाही अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवण्यात येतो. याचा मुख्य उद्देश ‘धर्मांतर करून नव्याने मुसलमान झालेल्यांना इस्लामचे शिक्षण देणे’, हा आहे. याद्वारे धर्मांतर केलेल्यांना जिहादी बनण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.

जिहादी महंमद गौस पाकमध्ये ४५ दिवस राहून आल्याचे उघड !

कन्हैयालाल यांची हत्या करणारे रियाज अन्सारी आणि महंमद गौस हे दोघेही या संघटनेशी जोडलेले होते. त्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला होता, तसेच यातील महंमद गौस हा ४५ दिवस पाकिस्तानमध्ये राहून आला होता. हे दोघेही आतंकवाद्यांसाठी ‘स्लिपर सेल’ (आतंकवाद्यांना स्थानिक ठिकाणी साहाय्य करणारे) म्हणून काम करत होते.

कन्हैयालाल यांच्या हत्येचे ‘एन्.आय.ए.’कडून अन्वेषण !

कन्हैयालाल यांच्ये हत्येची चौकशी करण्यासाठी राजस्थान सरकारने विशेष अन्वेषण पथक स्थापन केले असतांनाच त्यांनी याची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडेही (‘एन्.आय.ए.’कडेही) सोपवले आहे. एन्.आय.ए.च्या पथकाने घटनास्थळी जाऊन चौकशीही चालू केली आहे. या हत्येमागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याची माहिती समोर येत असल्याने ही चौकशी एन्.आय.ए.कडे सोपवण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

भारतात या संघटनेवर तात्काळ बंदी घाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कारागृहात डांबा !