परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अपार भाव असलेले देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै (वय ७२ वर्षे) !

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

आज ज्येष्ठ अमावास्या या तिथीला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांचा ७३ वा वाढदिवस आहे. पू. उमेश शेणै यांचा साधनाप्रवास येथे पाहूया.

पू. उमेश शेणै यांच्या चरणी ७३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांचा साधनाप्रवास वाचतांना त्यांची मागील अनेक जन्मांची साधना असल्यामुळे ‘त्यांना लहान वयापासूनच साधनेची ओढ आणि तळमळ होती’, हे लक्षात येते. त्यांना भेटलेल्या सर्व संतांविषयी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी त्यांच्या मनात असलेला अपार भाव लक्षात येतो. त्यांच्यातील ‘कर्तेपणा नसणे आणि परिस्थिती स्वीकारून आज्ञापालन करणे’ हे महत्त्वाचे गुण लक्षात येतात.

१. लहानपणापासून साधनेविषयी असलेले कुतूहल आणि साधनेची ओढ !

मला लहानपणापासून संन्यासी आणि संत यांच्याविषयी पुष्कळ जिज्ञासा असायची. मी त्यांना भेटून त्यांच्या साधनेच्या संदर्भातील प्रश्न विचारत असे. मी त्यांना ‘त्यांचा साधनामार्ग आणि त्यांच्या मार्गाने साधना करता येण्यासाठी ‘मी काय करायला हवे ?’, असा प्रश्न विचारत असे.

२. संतांचा वेळोवेळी लाभलेला सहवास आणि आशीर्वाद !

२ अ. श्री राघवेंद्रगुरुजींचा आशीर्वाद प्राप्त होणे आणि त्यांच्या माध्यमातून गुरुतत्त्वाचे मार्गदर्शन लाभल्याचे जाणवणे : वर्ष १९८४ मध्ये मी ‘एम्.ए.’ करत असतांना श्री राघवेंद्र स्वामी (तमिळनाडू येथील मध्व संप्रदायातील एक संत आणि तत्त्वज्ञानी) यांचे प्रत्यक्ष दर्शन झालेले होन्नाळी तालुक्यातील बसवापट्टण येथील श्री राघवेंद्रगुरुजी यांना मी वरचेवर भेटत होतो. त्यांनी स्थापन केलेल्या चतुर्मुख राघवेंद्र स्वामींच्या वृंदावनाच्या जीर्णाेद्धार कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. त्यामुळे मला त्यांचा पूर्ण आशीर्वाद लाभला. त्यामुळेच आज मला अध्यात्मात पुढच्या टप्प्याला घेऊन जाणाऱ्या प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) मार्गदर्शनाचे भाग्य लाभले. यातून ‘गुरुतत्त्व कोणत्या ना कोणत्या रितीने साधकाला योग्य साधनेत घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन करते आणि योग्य गुरूंकडे घेऊन जाते’, हे मला शिकायला मिळाले.

२ आ. मला अवधूत आचारबाबा आणि अवधूत योगिनीअम्मा, पू. सिद्दण्णा अन् प.पू. देवबाबा या संतांचाही अनेक वेळा सहवास घडून त्यांचे आशीर्वाद लाभले.

२ इ. प.पू. परुळेकर महाराज यांच्या आश्रमात राहून त्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभणे : वर्ष २००१ मध्ये मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प.पू. परुळेकर महाराज यांच्या भेटीची आणि ३ दिवस त्यांच्या आश्रमात राहून सेवा करण्याची संधी लाभली. ‘मी सनातन संस्थेचा साधक आहे’, हे जाणून ते अत्यंत आनंदी झाले. ‘सनातनचे साधक आणि ते करत असलेली सेवा’ याचे त्यांनी पुष्कळ कौतुक केले. त्यांनी आमच्या श्री गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) स्तुती केली.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सत्संग आणि अभ्यासवर्ग घेणे अन् त्यातून स्वतःचीही साधना होणे

वर्ष १९९८ नंतर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला टप्प्याटप्प्याने साधना करण्यासाठी प्रेरित केले. गुरुदेवांनी संसारातील कटकटी आणि मायेतील आवरण यात आकंठ बुडालेल्या मला योग्य साधनामार्गात आणून माझा भाग्योदय करून दिला. गुरुदेवांनी माझ्याकडून कर्नाटकमधील शिवमोग्गा जिल्ह्यातील सागर, न्यामती, शिवमोग्गा, शिकारीपूर, भद्रावती, सुरहोन्ने आणि ताळगुप्पा इत्यादी ठिकाणी असणाऱ्या सनातनच्या साधकांना भेटून त्यांचा सत्संग अन् अभ्यासवर्ग घेणे इत्यादी सेवा करवून घेतल्या. गुरुकृपेने साधकांची सत्संगातील संख्या वाढत गेली आणि त्यासह माझाही आध्यात्मिक विकास होत गेला. गुरुदेवांच्या कृपेने मला १६ वर्षे कर्नाटकात राहून सेवा करण्याचे भाग्य मिळाले. गुरुदेवांनी मला सेवा आणि साधना या माध्यमातून अनेक विषय शिकवले.

४. पत्नीचे आजारपण, तिची सेवा आणि निधन 

४ अ. पत्नीचे आरोग्य बिघडल्यावर सेवाकेंद्रातील विविध सेवा करायला शिकणे : मी अधिकोषाच्या चाकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर दीड वर्ष दक्षिण भारतात सेवा केली. गुरुदेवांनी मला संपूर्ण दक्षिण भारतातील अनेक जिल्ह्यांना भेटी देऊन सेवा करण्याची संधी दिली. माझ्या पत्नीचे आरोग्य बिघडल्यानंतर त्यांनी मला मंगळुरू सेवाकेंद्रात विविध सेवा करायला शिकवल्या. सेवेत माझ्याकडून झालेल्या अनेक चुका पू. राजेंद्रदादांच्या (आताचे सद्गुरु राजेंद्रदादा शिंदे यांच्या) माध्यमातून दाखवून देऊन त्यांनी स्वभावदोषांमुळे माझी साधनेत होणारी अधोगती थांबवली.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ४ वर्षे पत्नीची सेवा केल्यानंतर संतपद प्राप्त होणे आणि पत्नीही जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त होणे : ‘माझा आणि पत्नीचा देवाण-घेवाण हिशोब अधिक आहे’, असे सांगून गुरुदेवांनी माझ्याकडून ४ वर्षे पत्नीची सेवा करवून घेतली आणि आमच्या दोघांमधील देवाण-घेवाण हिशोब न्यून केला. त्यांनी मला संतपदाला नेले आणि पत्नीला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त केले. पत्नीच्या आजारपणात तिची सेवा करण्याची संधी देणाऱ्या श्री गुरूंच्या चरणी कोटीशः नमन !

४ इ. पत्नीचे निधन झाल्यावर स्थिर रहाता येणे : मंगळुरू सेवाकेंद्रात असतांना माझ्या पत्नीची प्रकृती पुष्कळ बिघडली आणि त्यातच तिचे निधन झाले. तेव्हा गुरुकृपेने मी स्थिर होतो.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हात धरून साधनेत प्रगती करवून घेणे : पत्नीच्या मृत्यूनंतर माझ्या पुढील साधनेसाठी त्यांनी मला देवद आश्रमात जाण्यास सांगितले. माझ्या साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर गुरुदेव माझा हात धरून मला सामान्य साधक ते संतपदापर्यंत पुढे घेऊन गेले. याविषयी कृतज्ञता शब्दांत सांगणे शक्य नाही. ‘माझी साधना कशी होणे अपेक्षित आहे ?’ ते गुरुदेवांना ठाऊक आहे. मी कर्नाटकात असतांना गुरुदेवांनी टप्प्याटप्प्याने माझा हात धरून माझ्या मनात आणि बुद्धीत बसून माझ्याकडून सर्व सेवा करवून घेतल्या. गुरुदेवांनी माझी साधनेत पुढील प्रगती होण्यासाठी वरचेवर मार्गदर्शन करून माझा हात धरून मला पुढे नेले. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता अर्पण करतो.

(क्रमशः)

– पू. उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक