शिंदे गटातील शिवसेना आमदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या आणि सध्या गौहत्ती येथे असलेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या महाराष्ट्रातील घरांवर येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमणे होण्याचे प्रमाण वाढल्याने या आमदारांनी केंद्र सरकारकडे सुरक्षा मागितली होती. १५ आमदारांनी या संदर्भात पत्र लिहिले होते. त्यानंतर केंद्र सरकारकडून त्यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या सुरक्षायंत्रणेत केंद्रीय सुरक्षा बलाचे संरक्षण असते.

आमदार प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांच्या मालमत्तेवर यापूर्वी ‘ईडी’ने धाडी टाकल्या आहेत. त्यांना कारागृहात टाकणार असल्याचे भाजपच्या काही लोकांकडून सांगण्यात येेत होते. त्यांनाही ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यागपत्र दिलेले संजय राठोड यांचाही यात समावेश आहे. यामुळे या बंडखोरीप्रकरणी भाजपचा हात असल्याची टीका न फुटलेल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जात आहे.