पाकची आर्थिक दिवाळखोरीकडे जलद गतीने वाटचाल
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाक आर्थिक दिवाळखोरीकडे वेगाने जात आहे. हे टाळण्यासाठी पाकचे सरकार आटापिटा करत आहे. यापूर्वी सरकारने लोकांना त्यांच्या अतिरिक्त खर्चात कपात करण्याची सूचना दिली होत्या. आता दिलेल्या आदेशानुसार मिरवणुका, मेहंदी काढण्याचा समारंभ, भांगडा पार्टी यांसह सर्व कार्यक्रम रात्री ९ वाजेपूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत. रात्री ९ नंतर अनावश्यक पथदिवेही बंद ठेवण्यात येणार आहेत. यातून औषधांची दुकाने, पेट्रोल पंप, बस स्थानके, दुधाची दुकाने इत्यादींना सूट देण्यात आली आहे.
१. पाकच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, आम्हाला वीज निर्मितीमध्ये ७ सहस्र ४०० मेगावॅटचा तुटवडा जाणवत आहे. देशातील मागणी २८ सहस्र ४०० मेगावॅटवर पोचली असून उत्पादन २१ सहस्र मेगावॅट आहे. विजेची बचत करण्यासाठी सरकारने सर्व बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, विवाहाची सभागृहे आणि दुकाने रात्री ९ वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. यानंतर कलम १४४ लागू होईल.
२. आता सरकारी कार्यालयात केवळ ५ दिवस काम होणार आहे. शनिवारी कार्यालय बंद ठेवल्याने वार्षिक सुमारे ७ सहस्र ८३० कोटी रुपये (भारतीय) वाचतील, असा सरकारचा दावा आहे. तसेच सरकारने शुक्रवारी घरून काम करण्याचा पर्याय देत कर्मचार्यांना वाटप करण्यात येणार्या इंधनाच्या रकमेत ४० टक्के कपात करण्याचा आदेश दिला आहे. त्याचवेळी पाकचे सैन्य ‘ड्राय डे’ म्हणून साजरा करणार असून या दिवशी कोणतीही अधिकृत वाहने चालणार नाहीत.
३. इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते फवाद चौधरी यांनी सांगितले की, रात्री ९ वाजता बाजार आणि शॉपिंग मॉल्स बंद ठेवणे हा आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही. सरकारच्या अकार्यक्षमतेची आणि चुकीच्या कारभाराची किंमत जनता चुकवत आहे. वीज संकट सोडवण्याऐवजी शाहबाज सरकार पाकला अश्मयुगात घेऊन जात आहे.