‘धर्मदान मोहिमे’साठी सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांना केलेले प्रेरणादायी मार्गदर्शन आणि साधकांना आलेल्या अनुभूती !

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये
पू. (कु.) दीपाली मतकर

१. सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘अर्पण सेवेसाठी गेलेल्या साधकांनी गुरुकृपा कशी अनुभवली ?’, यांविषयी साधकांना सांगणे

‘सत्पात्रे दान’ हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. सनातनच्या आश्रमांसाठी धान्य, तसेच अन्य वस्तू अर्पण देण्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये चौकट प्रसिद्ध झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साधकांसाठी सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘मकरसंक्रांत पर्व अर्पण सत्संग’ घेतला. या सत्संगाचा आरंभ श्री अन्नपूर्णादेवीची भावार्चना करून झाला. तेव्हा आम्ही श्री अन्नपूर्णादेवीचे अस्तित्व अनुभवले. सद्गुरु स्वाती खाडये यांनी या सत्संगात ‘पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत अर्पण सेवेसाठी साधकांनी केलेले प्रयत्न अन् साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा’, यांविषयी सांगितले.

२. ‘धर्मदान मोहिमे’च्या माध्यमातून आपण समाजातील लोकांना गुरुकार्यात सहभागी करून घेऊन त्यांना गुरुसेवेची संधी देण्यासाठी जात आहोत’, असे सद्गुरु स्वातीताईंनी सांगणे

सद्गुरु स्वातीताई म्हणाल्या, ‘‘या अर्पण सेवेत आपण समाजाकडून काही घ्यायला नाही, तर समाजातील लोकांना गुरुकार्यात सहभागी करून घेण्यासाठी जात आहोत. आपण गुरुदेवांचे अखंड स्मरण करत आणि अधिकाधिक सकारात्मक राहून या सेवेतील आनंद घ्यायला हवा. ‘संतांना काय अल्प आहे ?’ पूर्वी संतही घरोघरी भिक्षा मागायचे; पण त्यातून समाजातील लोकांना संतांच्या सेवेची संधी मिळायची आणि ते संत समाजातील लोकांचे त्रास अन् प्रारब्ध नष्ट करायचे. सनातनच्या आश्रमात असणार्‍या श्री गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांना काय अल्प आहे ? तिथे साक्षात् माता महालक्ष्मी वास करते. तिथे धनधान्याची कोठारे भरलेली आहेत. त्यामुळे आपण केवळ शरण जाऊन आणि सकारात्मकतेने प्रयत्न करूया.’’ हे ऐकून साधकांची भावजागृती होऊन त्यांचा सेवेचा उत्साह वाढला.

– (पू.) कु. दीपाली मतकर

(‘वरील परिच्छेद वाचतांना ‘प्रत्यक्ष सद्गुरु स्वातीताईच मार्गदर्शन करत आहेत आणि मी ते ऐकत आहे’, असे दृश्य परिच्छेद वाचेपर्यंत माझ्या डोळ्यांसमोर येत होते. ‘त्यांचे शब्द म्हणजे स्वतः श्री गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच) आहेत’, असे जाणवून माझ्या संपूर्ण अंगावर रोमांच आले.’

– सौ. अमृता देशपांडे (१९.४.२०२२))

धान्य अभियानाच्या सेवेतून सर्व साधकांनी अनुभवलेला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री अन्नपूर्णामाता यांचा कृपाप्रसाद !

‘सद्गुरु स्वाती खाडये सोलापूर जिल्ह्यामध्ये होत्या. तेव्हा त्यांनी साधकांनी अडत दुकानदारांना (धान्याचे ठोक व्यापारी, म्हणजेच शेतमाल साठवून त्याचा व्यापार करणार्‍या मोठे दुकानदार यांना) संपर्क करण्याचे आणि धान्य अर्पण मिळवण्याचे नियोजन करून दिले आणि सांगितले, ‘‘जातांना चारचाकी वाहन घेऊन जा आणि धान्य भरून आणा.’’ यातून सद्गुरु स्वातीताईंचा संकल्प कार्यरत झाला. सोलापूर आणि धाराशिव येथील साधकांनी धान्य अन् वस्तू अर्पण घेण्यासाठी व्यापारी आणि दुकानदार यांना अर्पणाचे महत्त्व सांगून सनातनच्या आश्रमांसाठी यथोचित अर्पण देण्याचे आवाहन केले. त्यानंतर व्यापारी आणि दुकानदार यांनी उत्स्फूर्तपणे धान्य, वस्तू किंवा त्यांना जे अर्पण देणे शक्य आहे, ते देण्यास प्रारंभ केला. साधकांनी ही सेवा पूर्णपणे सकारात्मक राहून आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सोलापूरमधील अडत दुकानदारांना संपर्क करण्यास गेल्यावर साधकांना

श्री अन्नपूर्णामातेचा कृपावर्षावच अनुभवला. ही सेवा करतांना साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहोत.

१. सोलापूरमधील दुकानदारांशी ओळख नसतांनाही त्यांचा मिळालेला उत्तम प्रतिसाद !

१ अ. अडत दुकानदारांशी ओळख नसतांनाही धान्य अर्पण मिळणे

साधकांची अडत दुकानदारांशी ओळख नव्हती. साधकांनी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सनातनच्या आश्रमात धान्य अर्पण देण्याविषयीची प्रसिद्ध झालेली चौकट’ दाखवून आश्रमांविषयी माहिती सांगितली. गुरुदेवांच्या कृपेने साधक ज्या दुकानात जात होते, ते दुकानदार त्यांच्याकडील धान्य आणि कडधान्य अर्पण करत होते.

१ अ १. दुकानदारांनी धान्यसूचीतील वस्तू अर्पण देणे : एका दुकानदाराने धान्यसूचीमध्ये दिलेल्या वस्तूतील ‘तिखट आणि ज्वारी अर्पण करतो’, असे सांगितले, तर एकाने ‘मी बेसन देतो’, असे सांगितले. तेव्हा साधकांना ‘ज्योतसे ज्योत जगाओ ।’ ही गुरुदेवांची आरतीच चालू आहे’, असे अनुभवता आले.

१ अ २. धान्य अर्पण करून धान्याची पोती गाडीत भरण्यासाठीही संबंधित दुकानदारांनी साहाय्य करणे : धान्य अर्पण केल्यावर दुकानदार त्यांच्याच कामगारांकडून साधकांच्या वाहनात अर्पण केलेल्या धान्याची पोती ठेवण्यास सांगायचे. त्यामुळे ‘केवळ सकारात्मक राहून समोर जाऊन विषय मांडल्यावर गुरुतत्त्व कार्य करत आहे’, याचीच अनुभूती येत होती.

१ अ ३. साधकांना जेवण्यासाठी दुकानदाराने जागा स्वच्छ करून देणे : साधक जेवणाचे डबे घेऊन सेवेला गेले होते. साधकांनी एका दुकानदाराला विचारले, ‘‘तुमच्या दुकानात साधक जेवायला बसू शकतात का ?’’ तेव्हा त्यांनी लगेच दुकानाची मागील जागा स्वच्छ करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून दिले आणि ‘‘अजून काही सेवा असल्यास सांगा’’, असे सांगितले.

१ अ ४. साधकांनी शरणागती आणि सकारात्मकता वाढवल्यावर आरंभी प्रतिसाद न देणार्‍या दुकानदारांनीही नंतर धान्य अर्पण देणे : दुसर्‍या दिवशी या सेवेसाठी अन्य दुकानांत संपर्क केल्यावर आरंभी काही दुकानदारांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा साधकांनी ‘भगवंताला शरण जाणे आणि सकारात्मकता वाढवणे, यांसाठी ही गुरुलीला होत आहे’, असा भाव ठेवला. त्यानंतर जे दुकानदार आधी ‘नाही’ म्हणाले होते, तेच आमच्या मागे येऊन ‘धान्य काढून ठेवले आहे. घेऊन जा’, असे सांगू लागले. तेव्हा साधकांनी गुरुकृपा आणि भावाचे महत्त्व अनुभवले.

१ अ ५. सोलापूर सेवाकेंद्रात धर्मप्रेमी, व्यापारी आणि दुकानदार यांचा एक सत्संग घेऊन त्यांना सनातनच्या आश्रमांविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देणे अन् सेवाकेंद्र पाहून त्यांचा भाव जागृत होणे : सोलापूर सेवाकेंद्रात एका साधकांनी काही धर्मप्रेमी, व्यापारी आणि दुकानदार यांचा सत्संग घेतला. त्यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाविषयी माहिती सांगितली. तेव्हा त्यातील काहींनी ‘माझ्या संपर्कातील व्यापार्‍यांना या कार्याविषयी सांगून अर्पण देण्याविषयी सांगतो’, असे सांगितले, तर काहींनी सांगितले, ‘‘मीही तुमच्या समवेत सेवेला येतो.’’ ‘साधना सत्संगा’तील एक जिज्ञासू श्री. गुर्जर यांनी सांगितले, ‘‘मी साहीत्य ने-आण करण्यासाठी चारचाकी गाडी देतो.’’

त्या सर्व व्यापार्‍यांना सोलापूरचे सेवाकेंद्र दाखवल्यावर त्यांचा भाव जागृत झाला. ‘सेवाकेंद्रात बालसाधकांपासून ते वयोवृद्ध साधकांपर्यंत सर्व वयोगटांतील साधक साधना करतात’, हे पाहून दुसर्‍या दिवशी श्री. साई क्षीरसागर नावाचे व्यापारी स्वतःच्या अन् त्यांच्या भावाच्या कुटुंबियांना घेऊन सेवाकेंद्रात आले. त्यांनी कुटुंबियांना सेवाकेंद्रातील चुकांचा फलक आणि सेवेच्या नियोजनाचा फलक दाखवला आणि त्यांनी घरातील सर्वांना ‘साधक सेवाकेंद्रात सर्व कसे व्यवस्थित ठेवतात ?’, हे दाखवले. त्या व्यापार्‍यानेच सेवाकेंद्रातील व्यवस्थेचा प्रसार केल्याने साधकांना व्यापार्‍यांच्या कुटुंबियांना त्या संदर्भात काही सांगावे लागले नाही.

१ अ ६. नगरसेवक आणि व्यापारी कार्याशी जोडले जाणे : सोलापूर येथील नगरसेवक आणि व्यापारी यांना संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘अन्य जे व्यापारी अर्पण करू शकतात, त्यांची एक बैठक आयोजित करतो. तुम्ही त्यांना अर्पण आणि साधना यांचे महत्त्व सांगा. आपल्याला या कार्यात सगळ्यांना सहभागी करवून घ्यायचे आहे.’’

१ आ. अन्य अर्पण

१ आ १. सेवाकेंद्रासाठी लागणारे दूधही अर्पण मिळणे : सेवाकेंद्रासाठी प्रतिदिन आवश्यक असलेले दूध ‘संजय डेअरी’चे मालक घेऊन जाण्यास सांगतात. सेवाकेंद्रात सत्संग किंवा काही कार्यक्रम असेल, तर अधिक लागणारे दूधही ते अर्पण देतात.

१ आ २. भाजी विक्रेत्यांनी सोलापूर सेवाकेंद्रासाठी लागणारी भाजी साधक त्यांच्याकडे जाण्यापूर्वीच काढून ठेवणे : सोलापूर सेवाकेंद्रासाठी लागणारी भाजी अर्पण आणण्यासाठी भाजी बाजारामध्ये जाऊन तेथील भाजी विक्रेत्यांना विषय सांगून भाजी अर्पण घेण्यास आधी दीड घंटा लागायचा; पण आता भाजीविक्रेत्यांशी जवळीक झाल्यामुळे भाजीविक्रेते अर्पण द्यायची भाजी साधक बाजारात जाण्याआधीच काढून ठेवतात. काही भाजी विक्रेते आता दत्ताचा नामजपही करू लागले आहेत.

१ आ ३. विद्युत् साहित्य विकणार्‍या दुकानदारांनी केलेले साहाय्य : विद्युत् (इलेक्ट्रिक) साहित्य विकणार्‍या दुकानदारांना संपर्क केल्यावर त्यांनी ‘चार्जिंग’चे बल्ब अर्पण दिले. त्यांना आश्रमाविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘आश्रमातील विद्युत् जोडणीच्या (‘लाईट फिटींग’च्या) सेवेला येतो.’’

१ आ ४. अनोळखी जिज्ञासूंनी अर्पणाचा विषय ऐकून साखर अर्पण करणे : साधक काही धर्मप्रेमींना अर्पणाविषयी सांगत असतांना समाजातील अनोळखी जिज्ञासूंनी तो विषय ऐकला. दोन दिवसांनी त्यांना साधक दिसल्यावर ते स्वतःहून साधकांपाशी येऊन म्हणाले, ‘‘परवा तुम्ही एका धर्मप्रेमींना सांगत असलेला विषय आम्ही ऐकला. आम्हाला तो विषय आवडला. मला आणि माझ्या एका मित्राला या कार्यासाठी अर्पण द्यायचे आहे.’’ त्यानंतर त्यांनी साखर अर्पण दिली.

२. धाराशिव

२ अ. धाराशिव येथे साधकांना अर्पण मिळालेले धान्य गुरुकृपेने तेथील एका अडत दुकानदाराने त्यांच्या गाडीने सोलापूर सेवाकेंद्रात पोचवणे : धाराशिव येथे संपर्क केल्यावर तेथील अडत दुकानदारांनी लगेच धान्य अर्पण दिले. एका दुकानदाराने ३ पोती धान्य दिले. आम्ही त्यांना सांगितले, ‘‘आम्ही हे धान्य सोलापूरच्या सेवाकेंद्रात पाठवणार आहोत.’’ तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘माझी गाडी सोलापूरला जातच असते. तुम्ही तुमच्या सोलापूर सेवाकेंद्राचा पत्ता सांगा. मीच तिथे हे धान्य पोचवतो. यापुढेही तुम्हाला सोलापूर सेवाकेंद्रात काही पाठवायचे असल्यास मला सांगा. मी ते पोचवत जाईन.’’ त्यांनी साधकांना धाराशिव येथे अर्पणात मिळालेले धान्य सोलापूर सेवाकेंद्रात त्यांच्या गाडीने आणि त्यांच्या कामगारांच्या साहाय्याने पोचवले. तेव्हा साधकांनी भगवंताची अगाध कृपा अनुभवली. ‘केवळ विषय सांगायचा आणि चौकट दाखवायची. बाकी सर्व भगवंतच करत आहे’, हे साधकांनी अनुभवले. साधकांना धान्याची पोतीही उचलावी लागली नाहीत. ‘सर्वकाही गुरुदेवच करवून घेत आहेत’, असे जाणवले.

२ आ. प्रशिक्षणवर्गातील युवकांनी अर्पण स्वरूपात धान्य मिळवणे : धाराशिव येथे एक प्रशिक्षणवर्ग चालू आहे. तिथे हा विषय सांगितल्यावर रोजगारावर घर चालवणार्‍या युवकांनीही धान्य स्वरूपात अर्पण आणून दिले.

३. धान्य अभियानाच्या सेवेत साधकांना आलेल्या अनुभूती

३ अ. सौ. पत्की आणि सौ. खजुर्गीकर (अक्कलकोट, जिल्हा सोलापूर) : सेवेला आरंभ केल्यावर गुरुदेवांनी सुचवल्याप्रमाणे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेली चौकट जिज्ञासूंना दाखवली. त्यानंतर दुकानदारांना काही सांगावेच लागले नाही. आम्हाला अर्पण मिळत गेले. जे अनोळखी होते, तेही त्यांना काही न सांगता अर्पण देत होते. त्यातील काही जिज्ञासूंनी ‘आम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होऊ’, असेही सांगितले. गुरुकृपेने दिवसभरात पुष्कळ धान्य अर्पण मिळाले.

३ आ. एक साधक, अकलूज (जिल्हा सोलापूर) : एका दुकानात धान्य अर्पण घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी पैसे अर्पण केले. त्यांच्या दुकानातील ३ कामगारांनाही अर्पणाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी अर्पण दिले. त्या दुकानदारांनी त्यांच्या नातेवाइकांना संपर्क करून नातेवाइक आणि शेजारी यांच्याकडूनही धान्य अर्पण मिळवून दिले.

३ इ. श्री. अनिल डहाळे, श्रीपूर (अकलूज) : दैनिक ‘सनातन प्रभात’चे एक वाचक आणि त्यांचे नातेवाईक यांना धान्य अर्पणासाठी संदेश पाठवल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यातील एकाने स्वतःहून अर्पण आणून दिले.

३ ई. सौ. अनुराधा कंदी, सौ. वर्षा वैद्य आणि सौ. सुरेखा हंचाटे (सोलापूर) : या तीन साधिकांनी नियोजन करून अत्यंत शरणागतभावाने सेवा केली. संपर्कासाठी गेल्यावर दुकानांमध्ये सनातन संस्थेचे कार्य सांगतांना ते दुकानदार लक्षपूर्वक ऐकत होते. अनेक दुकानदार सकारात्मक होते.

३ उ. श्री. विनोद भुतडा (कुमठा नाका, सोलापूर) : एका अर्पणदात्याला संपर्क केला. त्यांचा कडधान्यापासून डाळ बनवण्याचा कारखाना (डाळ ‘मिल’) आहे. त्यांना अर्पणाचे महत्त्व आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चौकट दाखवून सनातन संस्थेविषयी सांगितल्यावर त्यांनी तूरडाळ अर्पण दिली. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदारही झाले. ‘सनातन संस्कार वही’ पाहून ते म्हणाले, ‘‘आमचा अनाथाश्रम आहे. तिथे मुलांना वह्या लागतात. त्यासाठी ‘किती वह्या लागतील’, ते मी तुम्हाला एप्रिल किंवा मे मासामध्ये भ्रमणभाष करून सांगतो.’’

३ ऊ. सौ. सुनिता न्यामणे आणि सौ. वर्षा वैद्य, सोलापूर : समाजातील जिज्ञासू धान्य अर्पण देतांना ते भावपूर्ण प्रार्थना करून आणि त्या धान्याला भावपूर्ण नमस्कार करून देत होते.

१. अशोक चौकात एका जिज्ञासूचे भांडी विकण्याचे दुकान आहे. ते म्हणाले, ‘‘आता मला भौतिक वस्तूंमध्ये आनंद वाटत नाही; परंतु आध्यात्मिक विषयात पुष्कळ आनंद मिळतो.’’ त्यांच्या तोंडवळा सात्त्विक आणि आनंद दिसत होता. त्यांना अर्पणाचे महत्त्व सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘धान्य किंवा आश्रमासाठी स्टीलचे वॉटर फिल्टर देतो.’’

२. एका दुकानदाराला ‘सनातन वही’ दाखवल्यावर ते म्हणाले, ‘‘मी माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सनातनच्या वह्यांचे वाटप करीन.’’

३. अन्य एका जिज्ञासूंना अर्पणाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी तांदूळ आणि गहू दिले. ते म्हणाले, ‘‘आमच्या घरी येऊन कुटुंबियांना अध्यात्माविषयी माहिती सांगा.’’

कुणालाही अर्पणाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांच्याकडून ‘नाही’, असे उत्तर आले नाही. त्यामुळे ही सेवा करतांना ‘आनंदाचा वर्षाव होत आहे’, असे आम्हाला जाणवले.

गुरुदेवांच्या कृपेने ‘धर्मदान मोहिमे’तून धान्य आणि वस्तू अर्पण मिळवण्याच्या अभियानामध्ये अखंड सकारात्मक अन् शरणागतभावात राहिल्याने सर्व साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री अन्नपूर्णामाता यांची कृपा अनुभवता आली, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (१८.४.२०२२)

(‘ही धारिका पहातांना ‘समोर गुलाबाची बाग असावी’, असा गुलाबाचा पुष्कळ सुगंध येत होता.’ – सौ. अमृता देशपांडे (१९.४.२०२२))

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक