अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांना आलेल्या विविध अनुभूती आणि त्यांचा हिंदु जनजागृती समितीविषयी असलेला जिव्हाळा !

१२ ते १८ जून २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्थानात दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाच्या समारोपीय सत्रात हिंदुत्वनिष्ठांनी अधिवेशन काळात आलेल्या अनुभूती, हिंदु जनजागृती समितीविषयी वाटणारा जिव्हाळा, विषयी हृद्य मनोगत व्यक्त केले. त्यांतील निवडक सूत्रे वाचकांसाठी येथे देत आहोत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संपर्कात आल्यानंतर नामजपातील शक्ती अनुभवली !

आधुनिक वैद्य नीलेश लोणकर

‘पूर्वी मी ध्यानमार्गाने साधना करत होतो. त्या वेळी नामजप कसा करावा ? हे मला ठाऊक नव्हते. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संपर्कात आल्यानंतर मी दत्ताचा नामजप चालू केला. मी शिवाचा २ कोटी १५ लाख जप केला. त्या वेळी मला अनेक अनुभव आणि अनुभूती आल्या. नामजपात शक्ती असते. त्यामुळे कोरोनाच्या काळात मला कोरोना झाला नाही. आश्रमात जसा भाव ठेवून सेवा केली जाते, तसे मी घरी करण्याचा प्रयत्न करतो.’

– आधुनिक वैद्य नीलेश लोणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, पुणे. (१८.६.२०२२)


कात्रण, तालुका दापोली येथील ह.भ.प. बाळकृष्ण बाईत यांना अधिवेशनात आलेल्या विविध अनुभूती !

ह.भ.प. बाळकृष्ण बाईत

१. ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात आल्यानंतर साधना, श्रवण सेवा, राष्ट्र-धर्म आणि परमभक्ती यांचे ज्ञान झाले. भारतातील सर्व संत येथे येत असतात. त्यामुळे येथे भक्तांचा संगम आहे.

२. एका अपघातात दुखापत झाल्यामुळे माझा एक हात वर करता येत नव्हते; मात्र येथे आल्यानंतर माझा हात सरळ वर करता येऊ लागले.

३. मी येथे आल्यानंतर वक्त्यांभोवती वलय दिसत होते. सर्वत्र चैतन्य जाणवत होते.

४. सनातनच्या ग्रंथांत सांगितल्याप्रमाणे दिनचर्या चालू केल्यानंतर मला आनंद मिळाला.

५. मी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवली. त्यामुळे ईश्वराने माझ्या चुका लक्षात आणून दिल्या.’

– ह.भ.प. बाळकृष्ण बाईत, कात्रण, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. (१८.६.२०२२)


केरळ येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे राजू पी.टी. यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेल्या अनुभूती !

श्री. राजू पी.टी.

भोजन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत असण्याची इच्छा झाल्यानंतर स्वप्नात तसे दृश्य दिसणे : हिंदु राष्ट्र अधिवेशनात भोजनगृहात एकत्र बसून हिंदुत्वनिष्ठ भोजन करत असल्याचे पाहून आनंद झाला. येथे सर्व संतांसमवेत भोजन करत असतांना मला वाटले की, गुरुदेवही (परात्पर गुरु डॉ. आठवले) येथे असायला हवे होते. तशी माझी इच्छा होती. हा विचार आल्याच्या रात्री मला स्वप्नात ‘माझ्या कुलदेवीच्या मंदिरात भोजन चालू असतांना गुरुदेव माझ्या शेजारी बसले आहेत’, असे दिसले.

हिंदी भाषा समजत नसूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदी भाषेतील मार्गदर्शन पूर्ण समजणे : वर्ष २०१४ मध्ये प्रथम मी गुरुदेवांचे दर्शन घेतले, त्या वेळी मला हिंदी भाषा येत नसतांनाही गुरुदेवांचे मार्गदर्शन मला समजले होते.

– श्री. राजू पी.टी., हिंदुत्वनिष्ठ, थ्रिसूर, केरळ. (१८.६.२०२२)


अधिवेशनस्थळी नामजप केल्यावर ५ मिनिटांतच ‘डोक्यावर कुणीतरी हात ठेवला आहे’, याची अनुभूती आली !

अधिवक्ता निरज तिवारी

‘हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी मला नामजप करण्यास सांगितले. प्रारंभी मी नामजप करत नव्हतो. कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो. कोरोना महामारीच्या काळात मला वाटले की, आपण काहीतरी करायला हवे. त्यानंतर मी धर्मसेवा आणि नामजप करायला प्रारंभ केला. त्यानंतर येथे मला सद्गुरूंचे दर्शन झाले. अधिवेशनाच्या कालावधीत मला रात्री झोप येत नव्हती. त्या वेळी मी नामजप केल्यावर ५ मिनिटांतच ‘माझ्या डोक्यावर कुणीतरी हात ठेवला आहे’, याची अनुभूती आली. असा अनुभव येणे, ही माझ्या सौभाग्याची गोष्ट आहे.’

– अधिवक्ता निरज तिवारी, प्रतापगड, उत्तरप्रदेश. (१८.६.२०२२)


राजस्थान येथील श्री. रामराय शर्मा यांना परात्पर गुरु डॉ. आठवले, सनातन आश्रम आणि सनातनचे साधक यांच्याविषयी आलेल्या अनुभूती !

१. ‘मी ४ वर्षांपूर्वी सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. मी अधिवेशनस्थळी आल्यावर साधकांना भेटलो, तेव्हा मला माझ्या सगेसोयर्‍यांना भेटत असल्यासारखे वाटले.

२. रामनाथी येथे आल्यानंतर ‘मी स्वत:च्या घरात आलो आहे’, असे मला वाटले. ‘सनातनचा आश्रम म्हणजे माझ्या आत्म्याचे घर आहे’, असे मला वाटले.

३. मी जेव्हा नामजपाला बसतो, तेव्हा मला गुरुदेवांचे मुखमंडल दिसते.

४. ‘हिंदु राष्ट्र’ हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. त्यासाठी मी तन, मन आणि धन अर्पण करण्यास सिद्ध आहे.’

– श्री. रामराय शर्मा, समन्वयक, मां भगवती गायत्री ट्रस्ट (गायत्री परिवार), जयपूर, राजस्थान (गायत्री परिवार) (१८.६.२०२२)


श्री. प्रल्हाद शर्मा यांना सनातन आश्रम, हिंदु अधिवेशन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या ठिकाणी देवतांची अनुभूती आली !

श्री. प्रल्हाद शर्मा

१. ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित रहाणे, हा मी स्वत:चा गौरव समजतो.

२. ‘सर्व देवता स्वर्गातून उतरून सनातनच्या आश्रमात आल्या आहेत’, असे मला जाणवले.

३. ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या रूपात देवताच हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करत आहेत’, असे मी अनुभवले.

४. देशाच्या कानाकोपर्‍यातून देवमाणसे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी या अधिवेशनाला आली आहेत. येथे उपस्थित असलेल्या धर्मविरांमध्ये मला श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे रूप दिसत आहे. हे पाहून रामराज्याच्या म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मला कोणतीही शंका नाही.

५. अधिवेशनाला आल्यावर जी ऊर्जा मिळाली, ती ऊर्जा हिंदु राष्ट्राविषयी जनजागृती करण्यासाठी उपयोगात आणू. हिंदु राष्ट्राविषयीची प्रेरणा हिंदूंमध्ये जागृत करू.

६. आम्ही जयपूर येथे २०० गावांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम राबवणार आहोत. यापुढे समाजात हिंदु राष्ट्राचा विचार जागृत करण्याला प्राधान्य देऊ.

७. येत्या वर्षात राजस्थान येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अशा प्रकारचे अधिवेशन घेऊ.’

– श्री. प्रल्हाद शर्मा, सचिव, मां भगवती गायत्री ट्रस्ट (गायत्री परिवार), जयपूर, राजस्थान. (१८.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक