आजही आम्ही शिवसेनेतच आणि आमचा गट हाच अधिकृत ! – दीपक केसरकर, प्रवक्ते, एकनाथ शिंदे गट

श्री. दीपक केसरकर

गौहत्ती (आसाम) – आम्ही आजही शिवसेनेचेच असून आम्ही शिवसेनेचेच अधिकृत लोकप्रतिनिधी आहेत. आमच्या पक्षप्रमुखांना वारंवार सांगूनही त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कृतीत न आणल्याने आम्ही स्वतंत्र गट निर्माण केला आहे. आमच्या गटाकडे दोन-तृतीशांश बहुमत असल्याने आमचा गट हाच अधिकृत गट आहे. आमच्या सदस्यांचे सदस्यत्व रहित करण्याची पाठवलेली नोटीस अवैध आहे; कारण पक्षादेश हा केवळ सभागृहातील घटनेच्या संदर्भातच लागू होतो, अशी माहिती आमदार एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी गौहत्ती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी दीपक केसरकर म्हणाले,

१. आम्ही मुख्यमंत्र्यांचे त्यागपत्र मागितलेलेच नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तशी भाषा करू नये.

२. शिवसेना पक्षप्रमुखांकडे केवळ १६ ते १७ आमदार असून आमच्याच गटाकडे पूर्ण बहुमत आहे. आमच्या मागण्या घेऊन आम्ही वारंवार पक्षप्रमुखांकडे गेलो; मात्र त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे आम्हाला वेगळा गट स्थापन करणे भाग पडले. गट स्थापन करण्याचे आम्हाला घटनात्मक अधिकार आहेत.

३. राज्यात तोडफोड चालू आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तोडफोड करणार्‍यांवर कोणतीही कारवाई होत नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांनी राज्यात शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही निवडणुकीपूर्वी ‘भाजप-शिवसेना’ युती म्हणून एकत्र निवडणूक लढवली. युती तोडल्यानंतर भाजप रस्त्यावर उतरली का ? ते रस्त्यावर न उतरता शांत राहिले. त्याप्रमाणेच शिवसैनिकांनी आता शांत राहिले पाहिजे.

४. आम्ही कोणत्याही पक्षात विलीन होणार नसून आम्ही केवळ आमचा वेगळा गट स्थापन केलेला आहे. आमच्यातील काही सदस्यांची या गटाचे नाव ‘शिवसेना बाळासाहेब’ असे ठेवावे’, अशी मागणी होती; मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटातील सदस्यांनी ‘बाळासाहेबांचे नाव वापरू नये’, असे आवाहन केले. त्यानुसार आम्ही पुढे तसा विचार करू. आम्ही शिवसेनेतून निवडून आलो असल्याने ‘शिवसेना’ हे नाव वापरण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे.

५. मराठी माणसाच्या न्याय्य अधिकारांसाठी शिवसेना लढते. त्यामुळे ‘शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र राहिले पाहिजे’, हे आम्ही पूर्वीपासून उद्धव ठाकरे यांना सांगत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची गळचेपी करत आहे. आजही आम्ही परत तेच सांगत आहोत.

६. अन्य कोणत्याही पक्षासमवेत जाण्याविषयी आतातरी मी काही बोलू इच्छित नाही. आमचे गटनेते एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे सांगतील, तसे आम्ही करू.