भारताने अफगाणिस्तानातील दूतावास पुन्हा उघडला : तालिबानकडून स्वागत

भारतीय दूतावास

काबूल – अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर १० मासांनी भारताने तेथील भारतीय दूतावास पुन्हा चालू केला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केल्यावर भारताने हा दूतावास बंद केला होता. अफगाणिस्तानला मानवतावादी साहाय्य पुरवण्याच्या प्रयत्नांच्या दृष्टीने आणि अफगाणिस्तानच्या लोकांशी करण्यात येत असलेल्या संपर्कावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी भारतीय तांत्रिक पथक काबूलमध्ये पोचले आहे. अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्त लोकांसाठी भारताकडून जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात येत आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. अफगाणिस्तानात दूतावास पुन्हा चालू करण्याच्या भारताच्या निर्णयाचे अफगाणिस्तानने स्वागत केले. आंतरराष्ट्रीय राजनैतिक नियमांनुसार दूतावासाच्या परिसराच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असे आश्‍वासन अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल कहर बल्खि यांनी दिले.