नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी आज सिडकोला घेराव !

नवी मुंबई, २३ जून (वार्ता.) – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवावेत, यांसाठी सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्तांनी २४ जून या दिवशी सिडको भवनाला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. २४ जून या दिवशी दि.बा. पाटील यांचा स्मृतीदिन आहे.

‘नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे’, या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांनी मागील वर्षी साखळी आंदोलन केले होते. ९ ऑगस्टला क्रांतिदिनी मशाल मोर्चा, १७ मार्चला भूमीपुत्र परिषद, सिडको वर्धापनदिनी काळादिन आंदोलन, २४ जानेवारीला विमानतळ कामबंद आंदोलन अशी आंदोलने केली; परंतु सिडको आणि महाराष्ट्र सरकार प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आल्याने ते संतप्त झाले आहेत. सिडकोच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आणि प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी सीबीडी-बेलापूर येथील सिडको भवनावर घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.