मुलांना शूरवीर असे करा !

प्रत्येक आई-वडिलांना वाटते की, आपल्या मुलांनी मोठे व्हावे, नाव कमवावे, प्रसिद्धी मिळवावी इत्यादी. त्यासाठी ते जिवाचा आटापिटा करतात. त्यांना स्पर्धा-परीक्षांमध्ये सहभागी होण्यास सांगतात, तसेच सामान्यज्ञान वाढण्यासाठी विविध पुस्तके, लेख वाचण्यास देतात. या अनुषंगाने एका कुटुंबातील लक्षात आलेली एक विक्षिप्त घटना सांगते. त्या कुटुंबातील वडिलांना वाटायचे की, आपली मुलगी शूरवीर व्हायला हवी. तिच्या बोलण्यातूनही ती धाडसी असल्याचे दिसायला हवे. यासाठी त्यांनी तिला काही पुस्तके वाचायला दिली. त्या पुस्तकांचा आशय होता, ‘मराठी भाषेतील शिव्या !’ शिव्या कोणत्या द्याव्यात, या विषयावरील पुस्तक वडिलांनी मुलीला वाचायला देणे, हा कर्मदरिद्रीपणा नव्हे का ? हेतू सर्वथा योग्यच आहे; पण कृती पूर्णतः अयोग्य झाली. मुलीला शूर बनवायचे असेल, तर कोणती पुस्तके द्यायला हवीत, हेही पालकांना न कळणे लज्जास्पद आणि हास्यास्पद आहे.

शिव्यांची पुस्तके देऊन आपण त्यांचे मन धाडसी नव्हे, तर कलुषित करत आहोत, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. संस्कार लहानवयातच करायचे असतात. त्यातूनच मुलांची जडणघडण होते. ‘आपली वाचा शुद्ध आणि सात्त्विक असायला हवी. वाणीतून संस्कारमूल्ये बाहेर पडायला हवीत. मनाच्या वाणीतून सद्विचार प्रकट व्हायला हवेत’, असे आपली संस्कृती सांगते. बालमनाला घडवण्यात संस्कारांचा वाटा मोलाचा असतो; पण येथे तर उलटच होत आहे.

शिवी हे मुळातच असभ्यतेचे लक्षण आहे. वादविवाद किंवा भांडणे झाल्यावर शिव्यांची लाखोली वाहिली जाते. शिवी देणे म्हणजे एकप्रकारे असंस्कृतपणाच होय ! छत्रपती शिवरायांना जिजाबाईंनी संस्कारांचे बाळकडू दिले. त्यांच्यात वीरश्री निर्माण केली, ती शिव्या शिकवून नव्हे. स्वराज्यनिर्मिती करणाऱ्या शिवरायांच्या मातेचा आदर्श सर्वच पालकांनी ठेवायला हवा. आपल्याला गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. यातील राष्ट्रप्रेम आणि वीरश्री जागृत करणारी एक गोष्ट प्रतिदिन सांगितल्यासही मुले धाडसी होऊ शकतात. शूरविरांचे पोवाडे, क्रांतीकारकांचे बलीदान, तसेच मोगल आणि इंग्रज यांच्याविरुद्ध रचलेले गनिमी कावे यांविषयीच्या कथा सांगितल्या, तर मुले धीट होणारच ? धीट होण्यासह सदाचारीही होतील. आदर्श भावी पिढी घडवण्याचे दायित्व पालकांचे आहे. त्यामुळे मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श पालक व्हा !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.