सोलापूर येथे ‘पीओपी’च्या ४ लाख श्री गणेशमूर्तींच्या विक्रीचा पेच !

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपीच्या) मूर्ती पर्यावरणास घातक असल्याने केंद्र सरकारने अशा गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याची यंदा काटेकोर कार्यवाही होणार असल्याचे संकेत असल्याने सोलापुरात सिद्ध झालेल्या अनुमाने ४ लाख मूर्तींचे काय करायचे ? असा प्रश्‍न स्थानिक मूर्तीकारांना पडला आहे. (पीओपीच्या मूर्तींवर बंदी असेल, तर त्यासाठी स्थानिक प्रशासनाने मूर्तीकारांना मूर्ती बनवण्याला प्रारंभ करण्यापूर्वी चिकणमाती उपलब्ध करून देण्यासाठी काही प्रयत्न केले का ? मूर्तीकारांना चिकणमाती अथवा अन्य पर्याय उपलब्ध करून दिले नाहीत. आता सिद्ध झालेल्या मूर्तींविषयी मूर्तीकारांचे शंकानिरसन प्रशासन करणार का ? यातून प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसून येतो. – संपादक)

गतवर्षीही पीओपीच्या मूर्तींविषयी नियम उपस्थित झाल्याने अनुमाने २५ टक्के पीओपीच्या मूर्तींची विक्री झाली नाही. शिवाय दसऱ्यानंतर आतापर्यंत मूर्ती सिद्ध करण्याचे काम ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. सोलापुरात सिद्ध होणाऱ्या मूर्तींपैकी ८० टक्के मूर्तींना कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा या परराज्यात बाजारपेठ आहे. यंदा पीओपीच्या मूर्ती परराज्यात विकण्याचा प्रयत्न होणार आहे; मात्र नियमाची काटेकोर कार्यवाही झाल्यास मूर्तींची विक्री करणे अवघड बनून कोट्यवधींचा फटका मूर्तीकारांना बसण्याची शक्यता आहे.