मूर्तीला वज्रलेप करण्यासाठी भाविक, दर्शन आणि नित्यनेम यांवर अन्याय करू नये
सोलापूर, २१ जून (वार्ता.) – रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणांची दुरुस्ती करावी लागेल, असे मंदिर समितीकडून घोषित करण्यात आले होते. या अगोदर वर्ष २०२० मध्ये लेप दिल्यावर ८ वर्षे काही होणार नाही, असे स्पष्ट केले होते; मात्र २ वर्षांत लेप निघाला आहे. त्याचे कारण वेगळे दिले जात आहे. सध्या जो लेप मूर्तीला दिला आहे तो केवळ २ ते ४ वर्षे राहील, असे स्पष्ट केले आहे. असे असेल, तर लेपन एवढ्या अल्प कालावधीचे का करण्यात आले ? त्यामुळे पूर्वी आणि आता केलेला लेप त्यासंबंधीच्या मूर्तीवर वज्रलेप करतांना केलेला करार ‘मंदिर समिती पंढरपूर’ यांनी घोषित करावा. त्या करारानुसार मूर्तीचा वज्रलेप (आयुष्य) कालावधी, मंदिर समितीने घातलेले नियम आणि अटी पूर्णपणे पडताळून घेऊन ज्यांच्यासमवेत करार केला त्या संबंधितांवर, तसेच पूर्वी केलेला लेप करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन भाविक वारकरी मंडळ यांच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी स्वीकारले.
जिल्हाधिकऱ्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तीच्या वज्रलेपाच्या संदर्भात कारवाई करण्यात यावी, असे निवेदन १८ जून या दिवशी मुख्यमंत्री कार्यालय येथे ई-मेलद्वारे पाठवले होते; परंतु त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. तरी मूर्तीवर वज्रलेप या कारणासाठी भाविक, दर्शन आणि नित्यनेम यांवर अन्याय करण्यात येऊ नये. या वेळी ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, सर्वश्री ज्योतीराम चांगभले, मोहन शेळके, बळीराम जांभळे, गणेश वारे आणि पदाधिकारी उपस्थित होते. कारवाई न केल्यास आंदोलनाची चेतावणीही देण्यात आली आहे.