नूपुर शर्मा यांना भाजपने पुन्हा पक्षात घ्यावे !

अजमेर (राजस्थान) येथे हिंदु संघटनांकडून मोर्चा काढून मागणी !

अजमेर (राजस्थान) – महंमद पैगंबर यांचा कथित अवमान करणारे विधान केल्यावरून भाजपने पक्षाच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्यात यावे, यासाठी अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि काही संस्था यांच्याकडून मोर्चा काढण्यात आला होता. यात सहस्रो नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या हातात भारताचे राष्ट्रध्वज होते. या मोर्चाला ‘शांती मोर्चा’ असे नाव देण्यात आले होते. यापूर्वी नेपाळमध्ये, तसेच बिहारच्या आरा आणि वैशाली जिल्ह्यांत नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले होते.

मोर्च्याच्या आयोजकांनी सांगितले की, नूपुर शर्मा यांना देश-विदेशातून धमक्या मिळत आहेत. आमची महत्त्वाची मागणी त्यांना संरक्षण देण्याची आहे. जर शर्मा यांच्यावर गुन्हा नोंदवून खटला चालणार आहे, तर अशा प्रकारच्या धमक्या का दिल्या जात आहेत ? शर्मा यांना भाजपने पुन्हा पक्षात घ्यावेत; कारण शर्मा यांनी चुकीचे काहीही म्हटलेले नाही, अशीही आमची मागणी आहे.