इस्रायल सरकार कोसळळे, ३ वर्षांत पाचव्यांदा निवडणूक घेण्याची वेळ !

येरुशलेम – इस्रायलमधील नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वात असणारे आघाडी सरकार कोसळले असून देशात मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. परिणामी देशात गेल्या ३ वर्षांत पाचव्यांदा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. इस्रायलमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये या निवडणुका होऊ शकतात. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी झालेल्या करारानुसार परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड येत्या काही दिवसांसाठी देशाची सत्ता हाती घेतील. माजी पंतप्रधान आणि विद्यमान विरोधी पक्षनेते बेंजामिन नेतन्याहू यांचे पुन्हा सत्तेत येण्याचे प्रयत्न आहेत. बेनेट आणि लॅपिड यांच्यात करार झाला जेव्हा नेतन्याहू यांना सत्तेवरून बाजूला सारून सरकार स्थापन करण्यात आले होते.
महायुतीत सहभागी असलेल्या खासदारांना फोडण्याचा नेतन्याहू यांचा सातत्याने प्रयत्न होता. इस्रायलचा अरब पक्ष सत्ताधारी आघाडीचा भाग होता; पण तो सरकारवर अप्रसन्न होता. पॅलेस्टिनी प्रदेशात ज्यूंचे पुनर्वसन केले जात असल्याचा आरोप अरब पक्षाने केला होता.