पैसे उकळल्याच्या ३४ सहस्र तक्रारी !
नाशिक – महाराष्ट्रात ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’च्या अंतर्गत पात्र लाभार्थींना विनामूल्य वैद्यकीय उपचार दिले जातात; मात्र रुग्णालये उपचारांसाठी रुग्णांकडून पैसे उकळत असल्याच्या सर्वाधिक तक्रारी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे आल्या आहेत. एकूण ३४ सहस्र ५१६ तक्रारींपैकी तब्बल ८३ टक्के म्हणजेच २८ सहस्र ६६४ तक्रारी पैशांसंदर्भात आहेत. यात लाभार्थींकडून एकूण १५ कोटी ८५ लाख ६८ सहस्र ८८२ रुपयांची मागणी केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा पुढे असून ४ सहस्र १३५ तक्रारींपैकी ३ सहस्र ७७४ तक्रारी पैशांसंदर्भातील आहेत.
पडताळणी आणि सुविधा यांच्या नावाखाली अधिक रक्कम घेतली !
राज्यात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना’ एकत्रितपणे राबवल्या जातात. यात गरीब रुग्णांवर विनामूल्य उपचार केले जातात; मात्र महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांकडून पडताळणी आणि सुविधा यांच्या नावाखाली अधिक रक्कम घेतली जात आहे. औषधांसाठीही अधिक शुल्क दाखवले जात आहे. इतर तक्रारींत पात्र रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणे, प्रवास व्यय न देणे, रुग्णालयात वाईट सेवा देणे, रुग्णांकडे दुर्लक्ष करणे आदींचा समावेश आहे.
रुग्णालयांनी १० कोटी ७९ लाख रुपये परत केले !
राज्यात राबवल्या जाणाऱ्या ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजने’तून लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याच्या २८ सहस्र ४६४ तक्रारी जीवनदायी भवन यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. काही रुग्णालयांनी रुग्णांकडून एकूण १५ कोटी ८५ लाख ६८ सहस्र ८८२ रुपये उकळले आहेत. यातील २६ सहस्र ४६६ तक्रारींचा निपटारा करत रुग्णांना १० कोटी ७९ लाख ८८ सहस्र ४६९ रुपये परत करण्यात आले आहेत.
रुग्णालयांना बजावल्या नोटिसा !
‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनें’तर्गत काही रुग्णालयांनी रुग्णांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यात भरती करतांना आगाऊ रक्कम जमा करणे, पडताळणी आणि इतर शुल्क यांच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे घेतले जाणे असे प्रकार करण्यात आले. यासाठी संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या अहेत. तब्बल २६ सहस्र लोकांना १० कोटी रुपये परत केले आहेत.
संपादकीय भूमिका
|