आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती उत्पादनावर बंदी !

सोलापूर – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार शहरात महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी दिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती विसर्जन करण्याविषयी सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यामध्ये पीओपीच्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. याविषयी मार्गदर्शक तत्त्वांची स्थानिक स्वराज्य संस्थेला कार्यवाही करणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने महापालिका उपायुक्त घोलप यांच्या अध्यक्षतेखाली मूर्ती उत्पादक आणि विक्रेते यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर यांनी मार्गदर्शक सूचनांची सर्वांना माहिती दिली.

घोलप यांनी सांगितले की, शहरात महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार ‘माझी वसुंधरा अभियान’ आणि ‘राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम’ यांची प्रभावी कार्यवाही करण्यात येत असून शहर स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे काम प्रगतीपथावर आहे. घोलप यांनी पीओपी बंदीचे काटेकोर पालन करण्याविषयी सूचना देत पर्यावरणपूरक मूर्ती उत्पादन आणि विक्री यांवर अधिकाधिक भर द्यावा, असे आवाहन उत्पादकांना केले. मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष अमरनाथ यांनी याविषयी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आश्वासन दिले.

संपादकीय भूमिका 

  • प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालत असतांना प्रशासनाने मूर्तीकारांना शाडूमाती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे !
  • श्री गणेशमूर्ती शाडूमातीची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते; परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसने जलप्रदूषण होत नाही, असा अहवाल प्रयोगशाळांनी दिला आहे, हे लक्षात घ्या !