शनिशिंगणापूरचा चौथरा सर्व महिला आणि पुरुष यांना दर्शनासाठी खुला

५०० रुपये शुल्क आकारणार !

शनिशिंगणापूर

नगर – शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांना दर्शन घेण्यासाठी खुला करण्यात आला आहे; मात्र त्यासाठी आता इतर काही देवस्थानाच्या सशुल्क पासप्रमाणे ५०० रुपये देणगी मूल्य आकारले जाणार आहे. ‘५०० रुपयांची देणगी पावती घेणाऱ्या सर्व महिला किंवा पुरुष यांना चौथऱ्यावर जाऊन अभिषेक करता येईल’, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली. ‘शनैश्वर देवस्थान ट्रस्ट’च्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून १८ जूनपासून या निर्णयाची कार्यवाही चालू झाली आहे.

परंपरेचा आणि प्रथेचा भाग म्हणून पूर्वी या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नव्हता. या विरोधात धर्मशास्त्राचे नियम लक्षात न घेता काही वर्षांपूर्वी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर हा चौथरा महिलांसाठी खुला करण्यात आला; मात्र काही काळातच सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांनाच चौथऱ्यावर प्रवेश बंद करण्यात आला. त्यानंतर कोरोना महामारीच्या काळात मंदिर बंद होते. ते चालू झाल्यानंतर चौथरा खुला करण्याची मागणी होत होती. त्यामुळे देवस्थानने तो खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. (मंदिराचा इतिहास आणि त्याविषयीच्या परंपरा ५०० वर्षे जुन्या, तसेच कर्मकांडानुसार चालत आलेल्या आहेत. शनिशिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश आहेच; मात्र चौथऱ्यावर स्त्री आणि पुरुष या दोघांना प्रवेश नाही. शनि देवतेच्या प्रकटशक्तीचा महिलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे महिलांचे हित लक्षात घेऊनच शनिदेवाच्या जवळ महिलांनी न जाण्याची परंपरा धर्माने सांगितली आहे. मंदिर न्यासाने हे लक्षात घेऊन धर्मविरोधी निर्णय मागे घेणे योग्य होईल ! – संपादक)