VIDEO : देश, भाषा, संस्कृती आणि हिंदु धर्म यांच्याशी एकनिष्ठ राहून धर्मकार्य केल्यास हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही ! – जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकारजी महाराज, रुक्मिणी वल्लभ पीठ, कौंडण्यपूर, अमरावती, महाराष्ट्र

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कृतीशील होण्याचे हिंदूंना आवाहन !

जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकारजी महाराज

रामनाथी, १८ जून (वार्ता.) – हिंदूंवर कोणतेही संकट आले, तरी त्याने धर्माचा त्याग करू नये. ‘माझ्यासमोर अन्य पंथियांची कोणतीही विचारधारा आली, तरी मी हिंदु धर्माचा त्याग करणार नाही’, असा संकल्प हिंदूंनी करावा. आपला देश, भाषा, संस्कृती आणि धर्म यांच्याशी एकनिष्ठ राहून हिंदूंनी धर्मकार्य केल्यास हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही. हिंदूंनी कृतीच्या स्तरावर राष्ट्र आणि संस्कृती यांचे संवर्धन केले, तर भगवे कपडे घालण्याची आवश्यकता नाही, असे मार्गदर्शन अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील रुक्मिणी वल्लभ पीठाचे जगद्गुरु राम राजेश्वर माऊली सरकारजी महाराज यांनी १८ जून या दिवशी रामनाथी (गोवा) येथील ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त केले. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’चे संस्थापक श्री. नितीन चौगुले, कोरबा (छत्तीसगड) येथील ‘धर्मसेना’ संघटनेचे अध्यक्ष श्री. विष्णो पटेल, गोवा राज्यातील ‘गोमंतक हिंदु प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. अंकित साळगावकर आणि बेंगळुरु (कर्नाटक) येथील विश्व सनातन परिषदेचे अध्यक्ष श्री. एस्. भास्करन् आदी मान्यवर उपस्थित होते.

जगद्गुरु राम राजेश्वर माऊली सरकार पुढे म्हणाले,

१. भारतात इंग्रजी भाषेचे आक्रमण झाले, तरी हिंदूंनी आपली राष्ट्रभाषा हिंदीमध्ये बोलायला हवे.

२. ‘भारत हा सोन्याचा पक्षी नाही, तर तो सोन्याचा गरुड (दैवी पक्षी) आहे’, हेच आपण मानायला हवे.

३. आपल्या हिंदु धर्माचा प्रचार करतांना लाज वाटू नये. सध्या समाजात उच्चशिक्षण घेतलेल्या मुलांना अल्पशिक्षित आई-वडिलांची लाज वाटते. ही परिस्थिती पालटावी लागेल.

४. देशात हिंदु समाजाची दुर्दशा झाली आहे. आपल्या विचारधारेवर म्हणजे संस्कृतीवर अतिक्रमण होत आहे. धर्माचे परिवर्तन झाले की, विचारांचेही परिवर्तन होते. त्यामुळे हिंदूंनी हे रोखायला हवे. यासाठी अशी अधिवेशन आणि संमेलने आयोजित केली जातात.

५. हिंदु धर्मविरोधी गोष्टींच्या विरोधात लढण्यासाठी प.पू. रामानंदचार्य महाराज यांचा जन्म झाला आहे.

६. भारतातील सर्व संत संघटित झाले, तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो.

७. भारतात हिंदूंची संख्या अधिक आहे, तर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ का म्हटले जात नाही ? हिंदु राष्ट्राची आवश्यकता आता आहे आणि पुढेही राहील.

८. अमेरिका, आफ्रिकन, जपान येथील नागरिकांना त्यांच्या देशाचा अभिमान असतो, तसे हिंदूंना हिंदु राष्ट्राचा अभिमान वाटला पाहिजे.

९. देशात हिंदु बहुसंख्य असतांनाही त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढावे लागते, हे दुर्दैवी आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करायला हवेत.

सर्व नद्या समुद्राला मिळतात, तसे अधिवेशनात सर्व संघटना गोवा येथे संघटित झाल्या आहेत ! – जगद्गुरु राम राजेश्वर माऊली सरकार

गोमंतकाच्या भूमीवर दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. येथे हिंदूंच्या विचारधारेवर विचारमंथन होत आहे. जसे अनेक नद्या शेवटी समुद्राला मिळतात, त्याप्रमाणे देशातील सर्व राज्यांतून हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय येथे एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत.

जातीवाद आणि संघटनावाद सोडून हिंदू म्हणून पुढे यायला हवे ! – नितीन चौगुले, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

नितीन चौगुले

‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, गोहत्या, धर्मांतर हे रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवे. समाजात धर्माविषयी काम करत असतांना आमच्यावर खटले प्रविष्ट करून तडीपारही केले जाते; याउलट गोहत्या, बलात्कार, धर्मांतर करणारे इतर पंथियांचे ‘शांतीदूत’ आहेत. अशा ‘शांतीदुता’मुळे देशाचे तुकडे होत आहेत. धर्मनिरपेक्षता, साम्यवादी विचारसरणी धोकादायक आहे. देशातील मुसलमान महिला असुरक्षित असल्याची आवई उठवली जाते. बॉलिवूडमधून धर्मविरोधी कारवाया चालू झाल्या आहेत. ‘इस्लाम धोक्यात आहे’, ‘मुसलमानांवर अत्याचार होत आहेत’, असे खोटे भासवले जात आहे. ‘पुरस्कारवापसी’, ‘दलितांच्या हत्या’, ‘मुसलमानांच्या हत्या’ यांवरून देशात मोहीम राबवून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक पू. भिडे (गुरुजी) आणि हिंदुत्वनिष्ठ मिलिंद एकबोटे यांना जाणीवपूर्वक अडकवण्यात आले. कट रचून दंगल घडवण्यात आली. त्यामुळे धर्मविरोधी घटनांच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन कृती करायला हवी. आता हिंदुत्वनिष्ठ संघटित होत असल्यामुळे देशविरोधी कृतींना लगाम बसत आहेत. राजकीय पक्षांतील चांगले लोकप्रतिनिधी शोधून त्यांना धर्मकार्यात जोडले पाहिजे. हिंदूंची शक्ती वाढल्यामुळे काँग्रेसचे राहुल गांधी, श्रीमती सोनिया गांधी यांच्यासारखे नेते मंदिरात येत आहेत. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अयोध्या आणि काशी येथे जात आहेत. जातीवाद आणि संघटनावाद सोडून ‘हिंदू’ म्हणून पुढे यायला हवे.

लवकरच छत्तीसगडमधील प्रत्येक गाव ‘हिंदु गाव’ करू ! – श्री. विष्णो पटेल, अध्यक्ष, धर्मसेना, कोरबा, छत्तीसगड.

श्री. विष्णो पटेल

भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल, तर आपल्याला ध्यास घेऊन धर्माचे कार्य करावे लागेल. दिवस-रात्र विसरून धर्मकार्य करावे लागेल. जेथे जाऊ, तेथे हिंदुत्व सांगितले, तरच हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल. छत्तीसगडमध्ये ९७ टक्के हिंदु आहेत, परंतु हिंदूंवर ख्रिस्त्यांचा प्रभाव आहे.
मागील साडेतीन वर्षांत छत्तीसगड येथे मोठ्या प्रमाणात चर्च निर्माण झाले आहेत. अनाथाश्रम, रुग्णालय आदी सेवांच्या माध्यमातून धर्मांतर होत आहे. ते सेवेतून धर्मांतर करत असतील, तर आपणही समाजसेवेतून हिंदु धर्माचा प्रचार करू शकत नाही का ? ज्या घरात समस्या आहे, त्या घरांमध्ये आम्ही ‘हनुमानचालिसा’पठण चालू केले. धर्मांतर झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणले. हिंदु समाज केवळ उत्सवाच्या वेळी एकत्र येतात. हे लक्षात घेऊन आम्ही १ सहस्र ४२५ गणेशोत्सव मंडळांना संपर्क केले. या सर्व मंडळांना आम्ही हिंदु राष्ट्राची माहिती दिली. या मंडळांमध्ये साप्ताहिक ‘हनुमानचालिसा’पठण चालू करण्यात आले. आपण एकटे नाही. अनेक जण धर्मकार्य करत आहेत. त्या सर्वांना जोडायला हवे. वैचारिक क्रांतीची वेळ आली आहे. लवकरच आम्ही छत्तीसगडमधील प्रत्येक गावाला ‘हिंदु गाव’ करू !

हिंदु धर्माचा त्याग केलेल्या १० सहस्र लोकांना पुन्हा हिंदु धर्मात आणू !

‘हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी आम्ही आतापर्यंत ११ सहस्र पत्रे लिहिली आहेत. आणखी ११ सहस्र पत्रे आम्ही लिहिणार आहोत. जे हिंदु धर्म सोडून गेले आहेत, अशा १० सहस्र जणांना एका वर्षात पुन्हा हिंदु धर्मात आणू’, अशी ग्वाही श्री. विष्णु पटेल यांनी या वेळी दिली.

भारत हिंदु राष्ट्र होईपर्यंत आम्ही धर्मकार्य करत राहू !

हिंदु धर्मासाठी आम्ही कार्य करत होतो; परंतु हिंदु जनजागृती समितीने आमच्या कार्याला दिशा दिली. हिंदु जनजागृती समितीने धर्माकार्यासाठी जे कष्ट घेतले आहेत, त्यातून हे धर्मकार्य उभे राहिले आहे. हिंदु जनजागृती समिती हे कार्य करू शकते, तर आपण का करू शकत नाही ? भारत हिंदु राष्ट्र होईपर्यंत आम्ही कार्य करत राहू.

हिंदू संघटित झाल्यानंतर धर्मांतरसह अनेक हिंदूविरोधी प्रकार रोखू शकतो ! – अंकित साळगांवकर, अध्यक्ष, गोमंतक हिंदु प्रतिष्ठान, गोवा

अंकित साळगांवकर

आम्ही गोवा राज्यातील अनेक भागांतील धर्मांतराला विरोध करून अनेक हिंदूंना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश दिला आहे. धर्मांतराच्या विरोधात आम्ही पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. गोवा येथील काही शाळांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनीही धर्मांतर केल्याचे निदर्शनास आले. हिंदूंवर दबाव आणून धर्मांतर केल्याच्या आमच्या लक्षात आले. प्रारंभी धर्मांतराच्या विरोधात कायदा केला नव्हता; मात्र हिंदूंनी संघटितपणे धर्मांतराला विरोध केल्यावर गोवा येथील मुख्यमंत्र्यांना धर्मांतर करण्यावर बंदी आणावी लागत आहे. आतापर्यंत घडलेल्या धर्मांतराच्या प्रकरणांतील सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. ती कागदपत्रे मुख्यमंत्र्यांना देऊन ज्यांनी धर्मांतर केले, त्यांच्यावर कारवाई करण्याची मी मागणी केली आहे. गोवा सरकारने धर्मांतर रोखण्याचे प्रयत्न केल्यास त्याला माझ्यासह समस्त हिंदूंचा पाठिंबा राहील. धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनीही सहकार्य करायला हवे. धर्मांतर रोखणे हा माझ्या एकट्याचा नाही, तर संपूर्ण हिंदु समाजाचा विजय आहे. हिंदु संघटित झाले, तर धर्मांतरसह अनेक हिंदूविरोधी गोष्टींना रोखू शकतो. असे केल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते.

हिंदूंनो, माहिती अधिकाराचा उपयोग करून आपल्या मंदिरांची भूमी परत मिळवा ! – एस्. भास्करन्, अध्यक्ष, विश्व सनातन परिषद, बेंगळुरू, कर्नाटक.

एस्. भास्करन्

‘जिहाद’ म्हणजे युद्ध, संघर्ष ! हा शब्द मुसलमान धर्मग्रंथांमधून आला आहे, कुणा हिंदु अथवा ख्रिस्ती धर्माचा शब्द नाही. ‘जिहाद’ हा इस्लामकडून आणि इस्लामसाठी केलेला संघर्ष आहे. लँड जिहाद हा प्रकार नवीन नाही. ५०० वर्षांपूर्वी राममंदिर पाडून बाबरी ढाचा बांधला गेला. मथुरेत श्रीकृष्णाचे मंदिर पाडून ईदगाह मशीद उभारणे असो, वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरातील शिवलिंग तोडून तेथे बांधलेली ज्ञानवापी मशीद असो अथवा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण येथील आंजनेय मंदिर पाडून बांधलेली मशीद असो. हे सर्व ‘लँड जिहाद’चेच प्रकार आहेत.

श्री. भास्करन् पुढे म्हणाले की,

१. हिंदूंनी ‘माहिती अधिकार कायदा, २००५’चा उपयोग करून भूमी जिहादचा प्रतिकार करायला हवा. हिंदूंच्या मंदिरांची भूमी परत मिळवायला हवी. माहिती ही शक्ती आहे.

२. बेंगळुरूच्या चामराजपेट येथे वर्ष १८९१ मध्ये ईदगाह मैदान उभारण्यात आले. पुढे वर्ष १९६४ मध्ये न्यायालयाने हे ईदगाह पाडण्याचा आदेश दिला होता. तसेच मुसलमानांना पर्यायी स्थानही देण्यात आले होते. तरी त्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही ‘माहिती अधिकार कायद्या’चा उपयोग करून बेंगळुरु महानगरपालिकेकडून संबंधित भूमीची कागदपत्रे मिळवली. सरकारी अधिकार्‍यांकडे ती दाखवून ‘आम्हाला ईदगाह मैदानात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करता यावा’, अशी मागणी केली. हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांमुळे तेथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची आम्हाला अनुमती मिळाली.

३. बेंगळुरुमध्येच धर्मांधांनी हिंदूंच्या स्मशानभूमीवर अवैध नियंत्रण मिळवले होते. तेथे गाडण्यात आलेले हिंदूंचे ५ सहस्र ८०० मृतदेह काढण्यात आले आणि तेथे मदरसा उभारण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यास आम्ही प्रखर विरोध केला. त्यामुळे धर्मांधांचे हे षड्यंत्र विफल झाले. आज तेथे बेंगळुरू महानगरपालिकेची इमारत उभारण्यात आली आहे.