स्विस बँकेत भारतियांच्या पैशांत ५० टक्क्यांची वाढ !

स्विस बँकेतील सर्वच पैसा काळा पैसा नाही !

नवी देहली – स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकने १६ जून या दिवशी वार्षिक आकडेवारी घोषित केली. या आकडेवारीनुसार स्विस बँकेत भारतीय उद्योजक आणि आस्थापने यांनी ठेवलेल्या पैशांमध्ये वर्षभरात ५० टक्के वाढ झाली आहे. भारतीय संपत्ती ३८३ कोटी १९ लाख स्विस फ्रँकच्या (३० सहस्र ५०० कोटी रुपयांहून अधिक) घरात पोचली आहे. गेल्या १४ वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. याआधी वर्ष २०२० च्या शेवटी स्विस बँकेमधील भारतीय नागरिकांचा पैसा २.५५ अब्ज स्विस फ्रँक (२० सहस्र ७०० कोटी रुपये) होता. स्वित्झर्लंडमधील बँकांनी ही आकडेवारी एस्.एन्.बी.ला दिली आहे. अर्थात् ही आकडेवारी तो काळा पैसा असल्याचे दर्शवत नाही.

१. वर्ष २०२१ च्या शेवडी स्विस बँकांमध्ये भारतियांचे ३८३ कोटी १९ लाख स्विस फ्रँक होते. यांपैकी ६० कोटी २० लाख फ्रँक ग्राहकांच्या ठेवींच्या स्वरूपात आहेत.

२. ब्रिटनचे स्विस बँकेत ३७९ अब्ज फ्रँक आहेत. यानंतर अमेरिकन लोकांचे १६८ अब्ज फ्रँक जमा आहेत. वेस्ट इंडीज, जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, हाँगकाँग, लक्झेंबर्ग, बहामास, नेदरलँड, केमन आयलंड आणि सायप्रस हे स्विस बँकांमध्ये पैसे ठेवणार्‍या देशांमध्ये आघाडीवर आहेत. या सूचीमध्ये भारत ४४ व्या क्रमांकावर आहे.