कॅन्टोन्मेंट (पुणे) – कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे या वर्षी आषाढी वारी मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले; मात्र पुण्यामध्ये वारकऱ्यांच्या निवासासाठी अवघे दोनच मंडप टाकण्यात आले आहेत. हवामान खात्याच्या अनुमानान्वये या वर्षी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. मंदिराच्या परिसरातील शाळा, धर्मशाळा, सोसायटी आणि त्या पुढील मोकळ्या जागा या ठिकाणी वारकरी भक्तांसाठी व्यवस्था करावी, असे पत्र ‘भवानी पेठ पालखी विठोबा ट्रस्ट’चे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे आणि माजी नगरसेविका सुलोचना कोंढरे यांनी महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, तसेच भवानी भेट साहाय्यक आयुक्त यांना दिले आहे. यासंदर्भात अभियंता ज्ञानेश्वर सोनवलकर म्हणाले की, मंदिरात रंगरंगोटी, मंदिरातील आणि परिसरातील शौचालयाची दुरुस्ती आणि साफसफाई, मंदिर परिसरात आणि चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, पाण्याचे टँकर, अडीचशे मोबाईल टॉयलेट आदी व्यवस्थेसह महानगरपालिकेच्या ११ शाळांमध्ये वारकऱ्यांच्या रहाण्याची सोय करण्यात आली आहे. वर्ष २०१७ नंतर सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करू नये, असा उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने बाहेरील मंडप टाकण्याचे बंद केले आहे. (हाच नियम अन्य पंथियांनाही लागू करावा, ही अपेक्षा ! – संपादक)