हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा १९ ते २४.१०.२०२१ या कालावधीत मुंबई जिल्ह्यात दौरा झाला. त्या वेळी त्यांच्या समवेत असणाऱ्या साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. श्री. बळवंत पाठक, वडाळा, मुंबई.
१ अ. जिज्ञासूंच्या रुचीनुसार त्यांना त्या त्या विषयाची चलचित्रे दाखवून त्या विषयात हिंदु जनजागृती समितीने केलेले कार्य सांगणे
‘संपर्क अभियानाच्या वेळी सुनीलदादांनी समाजातील विविध स्तरांवरील जिज्ञासूंशी संपर्क केले. ते जिज्ञासूंच्या मनाच्या स्थितीचा अभ्यास करून विषय मांडत होते. ते जिज्ञासूंना विषय सांगतांना त्या विषयांच्या संदर्भातील चलचित्रे (व्हिडिओ) दाखवून त्या विषयात हिंदु जनजागृती समितीने केलेले कार्य आणि त्यामध्ये मिळालेले यश सांगत.’ त्यामुळे दादांची त्या जिज्ञासूंशी चांगल्या प्रकारे जवळीक होत असे.
१ आ. ‘जिज्ञासू कोणत्या प्रकारे सेवेत सहभागी होऊ शकतात ?’, ते पाहून त्यांना कृतीशील करणे
एका उद्योजकांशी अनौपचारिक संवाद साधत असतांना त्या उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप सांगितले. ‘ते २०० मंदिरांत स्वयंपाकासंबंधीची यंत्रसामुग्री पोचवण्याचा व्यवसाय करतात’, असे आमच्या लक्षात आले. तेव्हा सुनीलदादांनी ‘यांतील न्यूनतम १०० मंदिरांत राष्ट्र-धर्म यांविषयीचे ग्रंथ देऊ शकतो. ‘या सेवेतून व्यापक समष्टी साधना कशी होऊ
शकते ?’, हे त्यांना उदाहरणासह सांगितले. त्यामुळे त्या उद्योजकांनी १०० मंदिरांसाठी प्रत्येकी ३ ग्रंथ, असे एकूण ३०० ग्रंथ घेतले आणि धर्मकार्य केले.
१ इ. एक संपर्क झाल्यावर त्याचा अभ्यास करवून घेऊन त्यातील बारकाव्यांचे चिंतन करायला शिकवणे
एक संपर्क झाल्यावर दुसऱ्या संपर्काला जाण्यापूर्वी सुनीलदादा आम्हाला विचारायचे, ‘‘या संपर्कातून काय शिकायला मिळाले ?’’ तेव्हा आमच्याकडून ‘संपर्क कसा झाला ? फलनिष्पत्ती काय मिळाली ?’, याविषयी सांगितले जात होते. सुनीलदादा आम्हाला म्हणाले, ‘‘मी संपर्क करत असतांना माझ्या ठिकाणी तुम्ही असता, तर कशा प्रकारे विचार केला असता ? कुठे न्यून पडलात ? परिस्थितीनुरूप कशा प्रकारे प्रसंग हाताळायला हवा ?’, असा विचार करायला पाहिजे. ’’
१ ई. देवाच्या अनुसंधानात रहात असल्यामुळे एकाच वेळी विविध सेवा करता येणे
एक संपर्क संपवून दुसऱ्या संपर्कासाठी जातांना, तसेच भोजनाच्या वेळेत ‘पुढील संपर्काची स्थिती जाणून घेणे, प्रसंगी वाहन चालवणे, सहचालक असल्यास त्यांच्याशी संवाद साधणे, इतर जिल्ह्यातील समितीसेवकांना मार्गदर्शन करणे’ इत्यादी सेवा सुनीलदादा कुशलतेने करतात. सेवा करत असतांना ते अनुसंधान ठेवत असल्याने ‘देवच त्यांच्याकडून एकाच वेळी विविध सेवा करवून घेत आहे’, असे माझ्या लक्षात आले.’
२. श्री. रमेश घाटकर, भांडुप, मुंबई.
२ अ. समयसूचकता
‘आमची एका आमदारांशी भेट ठरली होती. आम्ही त्यांच्या भेटीसाठी गेलो. तेव्हा त्यांच्या समवेत एक नगरसेवक होते. आम्ही केवळ आमदारांना देण्यासाठी प्रसाद आणला होता. तेव्हा सुनीलदादांनी सतर्कतेने आमदारांच्या समवेत असणाऱ्या नगरसेवकांनाही प्रसाद देऊन त्यांच्याशी जवळीक निर्माण केली.’
३. श्री. देवीदास देवळे, कांदिवली, मुंबई.
३ अ. सकारात्मकता आणि सहजता
‘सुनीलदादांमध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवते. त्यांच्यात सहजता आहे. ते समोरच्या व्यक्तीचे बोलणे व्यवस्थित ऐकून घेतात आणि तिच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना ताण येत नाही. त्यांच्याशी बोलावेसे वाटते.’
(सर्व सूत्रांचा मास : नोव्हेंबर २०२१)