गुरुपौर्णिमेच्या औचित्याने साधकांनी अनुभवला चैतन्यदायी सोहळा !
पुणे, १४ जून (वार्ता.) – आनंदी, तळमळीने साधना करणाऱ्या आणि भाव असणाऱ्या पुणे येथील साधना सत्संगातील सौ. रश्मी रामचंद्र बापट (वय ६९ वर्षे), तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणाऱ्या, सतत कृतज्ञताभावात असणाऱ्या श्रीमती अमिता यशवंत सावरगावकर (वय ६३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ७ जून या दिवशी झालेल्या एका सोहळ्यात घोषित करण्यात आले. सद्गुरु स्वाती खाडये, पू. गजानन साठे, पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी या संतांच्या वंदनीय उपस्थितीत सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिली. या भावसोहळ्याच्या प्रारंभी कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) हिने भावप्रयोग घेतला. तिच्या सुमधूर आणि भावपूर्ण बोलांमुळे उपस्थित साधकांची भावजागृती झाली. त्यानंतर सद्गुरु स्वाती खाडये यांनी उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले. सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या दिंड्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती काही साधकांनी सांगितल्या. त्यानंतर नामदिंडीचे एक चलचित्र दाखवण्यात आले. ते पाहून सर्व साधकांनी पुन्हा दिंडी अनुभवल्याचे सांगितले. ‘गुरुपौर्णिमेला काही दिवस शिल्लक असून या कालावधीत झोकून देऊन कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी सद्गुरु स्वातीताईंनी मार्गदर्शन केले. सद्गुरु स्वाती खाडये यांनी सौ. रश्मी बापट आणि श्रीमती अमिता सावरगावकर यांचा श्रीकृष्णाचे छायाचित्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. सौ. रश्मी बापट आणि श्रीमती अमिता सावरगावकर यांच्या सहवासात असलेल्या साधकांनी त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा उलगडा केला. सौ. रश्मी बापट यांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतारूपी कविता गाऊन अर्पण केली. तेव्हा सोहळ्यातील वातावरण भावमय झाले.
सौ. रश्मी बापट यांनी सोहळ्यात गुरुचरणी अर्पण केलेली कविता
प्रथम श्रीगुरूंना करूनी वंदन । कार्य करूया मिळुनी आपण ।।
नित्य नवे पण हे सनातन भारतीय संस्कृतीचे जतन । करण्या झाली संस्था स्थापन ।। १ ।।
रागाची जागा घेईल प्रीती, दूर होईल शंका भीती ।
खचित मिळेल सुख शांती समाधान ।। २ ।।
नाम घेऊनी करूया कर्म, बाणवूया लढावूवृत्ती ।
घेऊ त्यातील मर्म जाणून ।। ३ ।।
माझ्याकडे शब्दच नाहीत ! – सौ. रश्मी बापट
मनोगत व्यक्त करतांना सौ. रश्मी बापट म्हणाल्या, ‘‘धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु स्वातीताई यांच्या कृपेमुळेच सर्वकाही झाले आहे. माझ्याकडे मनोगत व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. परमेश्वरानेच सर्वकाही करवून घेतले.’’
श्रीकृष्ण, परमपूज्य डॉक्टर माझ्या समवेत आहेत एवढाच माझा भाव असतो ! – श्रीमती अमिता सावरगावकर
मनोगत व्यक्त करतांना श्रीमती अमिता सावरगावकर म्हणाल्या,‘‘माझ्या आयुष्यात हा क्षण येईल, असा विचार कधीच केला नव्हता. मी फार काही प्रयत्न केले नाहीत. ‘श्रीकृष्ण, परमपूज्य डॉक्टर माझ्या समवेत आहेत’, एवढाच माझा भाव असतो. हे कसे काय घडले ? मला ठाऊक नाही. एका प्रसंगात परमपूज्य गुरुदेवांनी मला दर्शन दिले. त्या वेळी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. यजमानांनी पुष्कळ दिवस आजारपणात काढले. त्यांचे सर्वकाही करतांना ‘देवा तूच सर्वकाही कर’, अशी सतत प्रार्थना करायचे. देवाच्या कृपेनेच त्यांच्या निधनानंतर मला स्थिर रहाता आले.’’
‘ऑनलाईन’ साधना सत्संगात जोडणाऱ्या जिज्ञासू सौ. रश्मी बापट आणि श्रीमती अमिता सावरगावकर यांनी केवळ २ वर्षांत साधनेचे प्रयत्न करून गुरुदेवांचे मन जिंकले ! – सद्गुरु स्वाती खाडयेगुरुदेवांचे लक्ष आपल्या सर्वांवरच आहे. परमपूज्य गुरुदेवांच्या कृपेमुळे गुरुपौर्णिमेच्या आधीच आपल्याला हा सोहळा अनुभवायला मिळाला. ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात जोडणाऱ्या जिज्ञासू सौ. रश्मी बापट आणि श्रीमती अमिता सावरगावकर यांनी केवळ २ वर्षांत प्रयत्न करून गुरुदेवांचे मन जिंकले. दोघींनी आपल्याला आनंद दिला याविषयी दोघींच्या प्रतीही कृतज्ञ राहूया. गुरुपौर्णिमा ही साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली झाली की, प्रगतीचे दरवाजे सर्वांसाठी खुलेच असतात. सर्वच साधकांनी व्यष्टी आणि समष्टी साधना भावपूर्ण, भक्तीपूर्ण करून गुरुदेवांची कृपा संपादन करूया. |